रत्नागिरीत LPG गॅस टँकर आणि वॉटर टँकरचा भीषण अपघात; सुदैवाने गॅस गळती नाही

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील कापडगाव परिसरात LPG गॅस टँकर आणि वॉटर टँकर यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या धडकेनंतर LPG गॅसचा टँकर रस्त्यावरच पलटी झाला, ज्यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गॅस गळती झालेली नाही, ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची सूत्रे हाती घेतली.

सध्या घटनास्थळी क्रेन पाचारण करण्यात आली असून, रस्त्यावर पलटी झालेला गॅस टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व उपाय योजले जात असून वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे