तालुक्यातील अनेक महत्वाच्या रस्त्याची पुरती दुरावस्था
शासकिय विश्रामगृह परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्थाच नाही
राजापूर प्रतिनिधी :राजापूरात सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात जनतेतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ओणी पाचल रस्त्यासह या विभागाकडे देखभाल दुरूस्तीसाठी असलेल्या अनेक रस्त्यांची पुरती दुरावस्था झाली आहे. तर या विभागाचा कारभार ज्या कार्यालयातुन चालतो त्या कार्यालय परिसरात व शासकिय विश्रामगृहाबाहेर पुरेशी प्रकाश व्यवस्था व लाईट नसल्याची गंभीर बाब पुढे आली असून कोटयावधींची कामे करणारा हा विभाग एवढा दरिद्री कसा काय असा सवाल जनतेतुन उपस्थित केला जात आहे.
या विभागाच्या कार्यालय व विश्रामगृह परिसरात व बाहेर पुरेशा लाईट व प्रकाशाची व्यवस्था नसल्याची बाब बुधवारी या शासकिय विश्रामगृहावर आ. निलेश राणे यांच्या स्वागतासाठी आलेल्या राजकिय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. अनेकांनी याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली असून या विभागाच्या या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजापुरातील सार्वजनिक बांधकाम उप विभागाचा अनागोंदी कारभार कायमच चर्चेत राहिला आहे. या विभागाकडून केल्या जाणाऱ्या अनेक कामांच्या दर्जबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. या विभागाचे अधिकारी हे साईटवर जाण्याऐवजी कार्यालयात बसूनच कागदी घोडे रंगवतात असा आरोप आहे. अनेक अधिकारी तर कार्यालयात उपस्थिततच नसतात अशाही जनतेच्या तक्रारी आहेत. केवळ ठेकेदारांसाठी हे अधिकारी तात्काळ उपलब्ध होतात, मात्र जनतेसाठी नाहीत अशी अवस्था आहे. याच विभागाच्या अखत्यारित असलेले भू दसूर रस्त्याचे काम तब्बल दोन वर्षांनी सुरू झाले आहे. एवढा हा विभाग जागरूक आहे अशी या विभागाची ख्याती आहे.
या विभागाकडे असलेले अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. ओणी पाचल रस्त्याची तर दुरावस्था झाली आहे. तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरले जातात पण पुन्हा आहे तीच परिस्थिती अशी अवस्था आहे. राजापूर रेल्वे स्थानक, राजापूर गोठणे दोनिवडे या रस्त्याचीही तशीच अवस्था आहे. साईट पट्टया निट नाहीत, दिशा दर्शक फलक नाहीत, रंगरंगोटी नाही अशी अवस्था आहे. ज्या ठेकेदारांकडे ही देखभाल दुरूस्तीची कामे आहेत ती ते तकलादु करून केवळ बिले लाटत आहेत असा जनतेचा आरोप आहे.
या विभागाचे कार्यालय ज्या ठिकाणी आहे तेथे शासकिय विश्रामगृहाचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणावर लाकडे व कचरा व बांधकामाचें साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी फिरणेही मुश्कील झाले आहे. या ठिकाणी असलेंल्या शासकिय विश्रामगृहाबाहेर पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, गेटवर लाईट आहेत पण पेटत नाहीत अशी या विभागाची अवस्था आहे. बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे राजापूर दौऱ्यावर आले असता ते शासकिय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी शिवसेनेसह अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी या ठीकाणी आले होते. यात महिला पदाधिकारीही मोठया प्रमाणावर होते. यावेळी या विश्रामगृहाच्या गेटवर तसेच परिसरात लाईट नसल्याची गंभीर बाब पुढे आली. यावेळी अनेकांनी अधिकाऱ्यांना फोन लावून ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांच्याकडून कोणतीच सकारात्मक कार्यवाही झाली नाही. या विभागाच्या या अशा कारभाराविरोधात अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. किमान तुमचे कार्यालय व विश्रामगृह असलेल्या भागात तरी लाईट लावा अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
याच परिसरात लाखो रूपये खर्चुन उपअभियंत्यांसाठी निवासस्थान बांधण्यात आलेले आहे. मात्र यामध्ये उपअभियंता रहातच नाहीत अशी माहिती पुढे आली आहे. या विभागाच्या एकूणच कारभाराविरोधात स्थानिकांतुन तीव्र नाराजी व्यक्त होत असून यामध्ये सुधारणा कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी काही नागरिकांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.












