आंगवली येथील बेपत्ता इसमाची ओळख पटली
संगमेश्वर :तालुक्यातील मौजे मारळ फाटा ते कळकदरा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीझुडपात एका ५० ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आला. तपासाअंती हा मृतदेह आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणाची माहिती मारळ गावचे पोलीस पाटील देवदास चंद्रकांत सावंत यांना गुरुवारी, १९ मार्च २०२६ रोजी मिळाली. मारळ फाटा परिसरातून जात असताना त्यांना रस्त्याच्या खालच्या बाजूला उग्र कुजकट वास येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन खात्री केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूला काही अंतरावर असलेल्या गवताळ भागात एका पुरुषाचे प्रेत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मयताच्या अंगात ग्रे रंगाची फुल पँट, काळपट रंगाचा टी-शर्ट, डोक्यावर लाल टोपी आणि जवळच एक टॉवेल व शर्ट मिळून आला. सुरुवातीला हा मृतदेह अनोळखी वाटत असला, तरी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर मयताची ओळख पटवण्यात यश आले.देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू (B.N.S.S. १९४ प्रमाणे) नोंद करण्यात आली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.










