माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांची भूमिका
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा बनत चालला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आबालवृद्धांना होणारा त्रास लक्षात घेता नगर परिषदेने याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. कुत्र्यांच्या गळ्यात लोढणे बांधण्याच्या नगर परिषदेच्या विचाराला श्वानप्रेमींकडून विरोध होत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अडचणीत सापडले आहेत. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने नगर परिषदेने या निर्णयाबाबत माघार न घेता कायदेशीर चौकटीत ठोस कार्यवाही करावी, अशी भूमिका चिपळूण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी मांडली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती, रस्त्यांवरील वावर आणि लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. एका बाजूला या त्रासाचा सामना करणारे नागरिक, तर दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी पुढे येणारे श्वानप्रेमी, अशा परिस्थितीत नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तिहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य हवे!
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निर्णय घेताना केवळ विरोधाचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. श्वानप्रेमींना प्राण्यांविषयी प्रेम आणि काळजी असणे स्वाभाविक आहे; मात्र, त्याचवेळी कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रासही दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे नगर परिषदेने नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी आणि कायदेशीर उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा बापू काणे यांनी व्यक्त केली.
नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी लोढणे बांधण्याचा विचार केला असेल, तर त्याबाबत कायदेशीर तरतुदी, प्राण्यांचे कल्याण आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्व बाबींचा विचार करून निर्णयाची अंमलबजावणी करावी. श्वानप्रेमींच्या विरोधामुळे प्रशासनाने पूर्णपणे माघार घेणे योग्य ठरणार नाही. नागरिकांच्या जिवाशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर नगर परिषदेने ठाम भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी मांडले.
नसबंदीच्या प्रक्रियेबाबतही नागरिकांच्या मनात प्रश्न भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या नसबंदीच्या प्रक्रियेबाबतही नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. प्रत्यक्षात नसबंदीच्या शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने केल्या जातात का, त्यासाठी प्रशिक्षित आणि पात्र पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध आहेत का, आवश्यक उपकरणे व सुविधा योग्य आहेत का, तसेच या मोहिमेचे परिणाम काय आहेत, याची स्पष्ट माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. नसबंदी मोहिमेची पारदर्शक अंमलबजावणी, नियमित देखरेख आणि तिच्या परिणामांचे मूल्यमापन यांवर भर दिल्यास नागरिकांचा विश्वास वाढू शकतो. त्यामुळे नगर परिषदेने या प्रक्रियेची वस्तुस्थिती स्पष्ट करून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलावीत, अशी अपेक्षाही काणे यांनी व्यक्त केली.
गुहागरमध्ये कार्यरत संस्थेची मदत घेण्याची सूचना
दरम्यान, बापू काणे यांनी पाच दिवसांपूर्वी वर्धा येथील प्राणी बचाव केंद्राला भेट दिली होती. यावेळी त्यांना प्राण्यांच्या उपचार आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या कामाची माहिती मिळाली. ‘करुणा लय’ या संस्थेचे काही डॉक्टर गुहागर येथे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. हे काम पूर्ण करून संबंधित डॉक्टर पुढील आठवड्यात तेथून जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. चिपळूण नगर परिषदेने या संस्थेशी तातडीने संपर्क साधल्यास संबंधित डॉक्टर येथेही नसबंदीचे काम करण्यास तयार होऊ शकतात. मात्र, त्यांच्या सेवेसाठी आवश्यक शुल्क नगर परिषदेला द्यावे लागेल. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर उपाय शोधताना उपलब्ध तज्ज्ञांची मदत घेण्याचा पर्याय नगर परिषदेने तपासावा, अशी सूचना बापू काणे यांनी केली.
राजकीय मंडळींनीही पुढाकार घ्यावा
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ नगर परिषद प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेशी संबंधित बनला आहे. त्यामुळे शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रश्नावर आपापली भूमिका स्पष्ट करून ठोस उपाययोजनांसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा काणे यांनी व्यक्त केली. श्वानप्रेमींच्या भावना आणि प्राण्यांचे कल्याण यांचा आदर राखतानाच नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. केवळ चर्चा, विरोध आणि आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ न घालवता कायदेशीर, शास्त्रीय आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असताना नगर परिषद आणि लोकप्रतिनिधी यावर कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे आता चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.












