प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: “शिवकालीन शस्त्रे ही केवळ युद्धाची साधने नसून स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याची जिवंत प्रतीके आहेत. या शस्त्रांच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची ओळख तर होतेच, पण तरुण पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होते,” असे प्रतिपादन शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक शिबिर संदीप उर्फ नाना सावंत यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.बी.चौगले होते.
समूह साधन केंद्र विद्या मंदिर, धुंदवडे येथे आयोजित स्काऊट-गाईड श्रमसंस्कार शिबिराच्या पार्श्वभूमीवर शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी संदीप सावंत व सागर लोहार यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन विविध शस्त्रांची सविस्तर माहिती दिली. तलवार, भाला, ढाल यांसारख्या शस्त्रांचे प्रकार, त्यांचा उपयोग, तसेच त्या काळातील युद्धनीती यांचे प्रात्यक्षिकांसह विवेचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शस्त्रांविषयी विविध प्रश्न विचारून आपले कुतूहल व्यक्त केले.
त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जाण वाढून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगत विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन आणि देशभक्तीची भावना रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले. शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या उपक्रमामुळे परिसरात इतिहासाबद्दलची जागरूकता निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली.










