अल्पवयीन युवती प्रकरणात आणखी तिघांवर गुन्हा ; आरोपींची संख्या सहावर

अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी कारवाई तीव्र ; आणखी आरोपी वाढण्याची शक्यता

वैभववाडी प्रतिनिधी :
त्या अल्पवयीन युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व विनयभंग प्रकरणात नवीन घडामोड समोर आली असून, या घटनेचे व्हिडिओ जवळ बाळगून ते व्हायरल केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आणखी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये श्रेयस संजय राणे (वय १९, रा. परटवली, ता. राजापूर) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

यापूर्वीच लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्याने तिघांचा समावेश झाल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या सहा झाली आहे.

सदर प्रकरणात नेर्ले गावातील मयूर सुर्वे व ओंकार पंढरी सुर्वे तसेच राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील पंकज पवार यांना अटक करण्यात आली होती. या तिघांना सुरुवातीला पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना २० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलीस कोठडीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रेयस राणे याच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अश्लील व्हिडिओ जवळ बाळगून तो व्हायरल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. श्रेयस राणे याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तर दोन अल्पवयीन मुलांना समज देऊन सोडण्यात आले आहे.

या गंभीर प्रकरणाचा वैभववाडी पोलीस कसून तपास करत असून, ज्यांच्याकडे संबंधित व्हिडिओ आहेत किंवा ज्यांनी ते व्हायरल केले आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.