शिरोडा येथे रंगली साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या ‘अलाणे -फलाणे’ ललित मासिकातील सदरावरील पुस्तकावर चर्चा…

वेंगुर्ले l दाजी नाईक :सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या खुल्या साहित्य चर्चेत जयवंत दळवी यांच्या ‘अलाणे -फलाणे’ या ललित मासिकातील सदरावरील पुस्तकावर चर्चा करण्यात करण्यात आली.

साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत साहित्यिक श्री.विनय सौदागर यांनी पत्ररूपातील या सदराच्या स्वरूपाविषयी थोडक्यात माहिती सांगून सदराविषयी विवेचन केले. साहित्यिक क्षेत्रातील तात्कालीन घडामोडींचा नर्मविनोदी पद्धतीने पत्ररूपात दळवी यांनी घेतलेला वेध असे ‘अलाणे -फलाणे’ सदराचे वर्णन त्यांनी यावेळी बोलताना केले.

सभोवताली घडणाऱ्या साहित्यिक घडामोडींची माहिती असल्याशिवाय ‘अलाणे -फलाणे’ यांचा हा पत्रव्यवहार समजणे कठीण होते असेही ते म्हणाले.दळवी यांनी या सदरामधून स्वतःवरही टीका केली असल्याचे सांगून या पुस्तकातील निवडक उतारे त्यांनी यावेळी वाचून त्यावर विवेचन केले.

तदनंतर झालेल्या चर्चेत खटखटे ग्रंथालयाचे सदस्य सचिन दळवी, प्रा.गजानन मांद्रेकर,कवयित्री प्रा.नीलम कांबळे, लेखिका स्नेहा नारिंगणेकर,चोखंदळ वाचक सरोज रेडकर,जयदीप देशपांडे तसेच ग्रंथप्रेमी एकनाथ शेटकर,अविनाश जोशी, शरद परुळेकर,सुनंदा परुळेकर,विनया परुळेकर यांनी भाग घेतला. खुल्या साहित्य चर्चेतील अठ्ठाविसाव्या पुस्तकावरील या चर्चेच्या प्रारंभी विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,तर शेवटी खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अर्चना लोखंडे यांनी ऋणनिर्देश केला.