एकाच छताखाली सर्व दाखले : महसूल मंडळातील ८ गावांना होणार लाभ
सावंतवाडी । प्रतिनिधी :महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर बुधवार, २५ मार्च रोजी ग्रामपंचायत वेत्ये येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडणार आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल विभागाशी संबंधित सर्व कामे एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी मार्गी लावून जनतेला दिलासा देणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरामध्ये क्षेत्रफळ महसूल मंडळातील इन्सुली, क्षेत्रफळ, कुंभार्ली, वेत्ये, निगुडे, रोणापाल, शेर्ले आणि कास या गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिबिरादरम्यान नागरिकांना उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रेशनकार्ड संबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना, पी. एम. किसान योजना आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी यांसारख्या विविध शासकीय योजनांचे लाभ व प्रमाणपत्रे मिळवता येतील. तसेच महसूल विभागाशी संबंधित अन्य प्रलंबित कामांचाही निपटारा यावेळी करण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.









