पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारस प्रतिनिधींना वारस हक्काने तात्काळ नोकरी मिळण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जात असून, येत्या काळात त्यांच्या हातामध्ये नियुक्ती पत्रे दिली जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास व मत्सव्यवसाय मंत्री, तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्री राणे यांची भेट घेऊन या संदर्भातील मागणीचे निवेदन दिले.
सफाई कामगारांच्या वारसांना हक्काची नोकरी मिळावी यासाठी गोपाळ नामदेव सावंत, सुनील नारायण परब, संदीप भागू पाटील व नितीन सदानंद कदम यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भोसले यांनी सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली.
यावर बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “महाराष्ट्र शासन या विषयात अत्यंत सकारात्मक आणि सतर्क आहे. नगरविकास मंत्रालयाच्या वतीने मागील अधिवेशनातच यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. तसेच सावंतवाडी नगरपरिषद कौन्सिलनेही यापूर्वीच सफाई कामगारांना त्वरित नोकरी देण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून लवकरच या कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेतले जाईल. इतकेच नव्हे तर, आपल्या पुढील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान पात्र वारस प्रतिनिधींना थेट नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाईल, असे ठोस आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले. पालकमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि शिष्टमंडळातील सदस्यांनी पालकमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.













