वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजित ‘गरूडझेप’ महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी रात्री जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये ‘शुभ्रास्टार होडावडा’ संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
वेंगुर्ले राऊळवाडा येथे नायरा पेट्रोलपंपा नजिक ही जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, नगरसेविका समिधा रेडकर, लीना म्हापणकर, मयुरी केरकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गातून तब्बल १६ संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शुभ्रा स्टार होडावडे संघ, द्वितीय क्रमांक खुशी फायटर तळवडे संघ आणि तृतीय क्रमांक जय आदिवासी संघ वेंगुर्ले यांनी पटकाविला. स्पर्धेत बेस्ट अँकलमन म्हणून साहिल तळवणेकर आणि बेस्ट फ्रंटमॅन म्हणून दिपक पार्सेकर याला गौरविण्यात आले. यातील प्रथम तिन्ही संघांना ८ हजार, ५ हजार व ३ हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पंच म्हणून श्री हेमंत नाईक, श्री हेमंत गावडे, श्री गौरश वायगंणकर, श्री ऋत्विक आंगचेकर, श्री आकाश साळकर, श्री त्रिंबक आजगांवकर यांनी काम पाहिले तर श्री जयेश परब यांनी सुंदर असे समालोचन केले. दरम्यान उद्या सोमवार दि. २३ मार्च रोजी सायं. ७ वा. नायरा पेट्रोलपंपानजिक सत्कार समारंभ, त्यानंतर रात्रौ ८ वा. वेंगुर्ल्यामध्ये प्रथमच शिगमोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. तरी या कार्यक्रमांनाही सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.











