शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा रूपेश राऊळ यांना टोला
अशोक खरातला पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांचाही निषेध नोंदवावा
सावंतवाडी । प्रतिनिधी : आ. दीपक केसरकर यांना केवळ राजकीय हेतूने टार्गेट करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याही राजीनाम्याची मागणी करावी. तसेच भोंदूबाबा अशोक खरात याला ४० किलोमीटरवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांचाही निषेध नोंदवावा, अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर जोरदार प्रहार केला.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब बोलत होते. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, महादेव पांगम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उबाठा गटाचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद घेत आ. केसरकर यांच्या राजीनामाची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर परब म्हणाले की, मोर्चा काढण्याची आणि राजीनामा मागण्याची भाषा करणाऱ्या रूपेश राऊळ यांनी आधी स्वतःच्या पक्षातील नेत्यांकडे पाहावे. आमदार मिलिंद नार्वेकर यांचेही अशोक खरातसोबतचे फोटो महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहेत. जर केसरकरांचा राजीनामा मागितला जात असेल, तर सर्वपक्षीय मोर्चाने नार्वेकरांच्या राजीनाम्याचीही मागणी केली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत संजू परब पुढे म्हणाले की, अशोक खरातला ४० किलोमीटरवरून पाणी आणून देण्याचे काम मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे राऊळ यांनी जर निषेधच करायचा असेल, तर तो आपल्या पक्षप्रमुखांचाही करावा. केवळ राजकारण म्हणून राजकारण करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
आ. केसरकर हे देवभक्त आहेत. प्रवासात कुठेही मंदिर दिसले की ते थांबतात आणि दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर तो माणूस कसा आहे हे लिहिलेले नसते. जर एखाद्या व्यक्तीच्या कृत्याची माहिती असतानाही कोणी त्याच्याकडे जात असेल, तर तो दोषी ठरतो. मात्र, केसरकर केवळ तेथील मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत.
यावेळी परब यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. “जिल्ह्यात काँग्रेस हा संपलेला पक्ष आहे. ज्या उमेदवारांचे १६ मते पडून दोनदा डिपॉझिट जप्त झाले आहे, अशा लोकांच्या टीकेला आम्ही उत्तर देणे टाळतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.













