सावंतवाडी : शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल समोरील जिमजवळ एका मद्यधुंद टेम्पो चालकाने उभ्या असलेल्या पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. यात सर्व दुचाकींचे मोठे नुकसान झाले. ही घटना मच्छी मार्केट रोडवर घडली असून, यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मालवाहू टेम्पो भरधाव वेगाने मच्छी मार्केट रोडवरून येत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी पूर्णपणे खराब झाल्या. नुकसान झालेल्या दुचाकींच्या मालकांनी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे.
या घटनेमुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. नागरिक आणि दुचाकी मालकांनी पोलिसांच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. बराच वेळ होऊनही पोलिस घटनास्थळी दाखल न झाल्याने वाद चिघळला होता.
अखेर पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्यासह पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे, संभाजी पाटील, मयूर निरवडेकर, अमित राऊळ, महेश जाधव, आणि पंडलिक सावंत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कारवाई सुरू केली. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.













