व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हवालदिल

राजापूर शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर
प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी

राजापूर (प्रतिनिधी): इराण विरूध्द अमेरिका ईस्त्राईल सुरू असलेल्या युध्दाचे परिणाम आता शहरांबरोबरच ग्रामीण भागातही जाणवू लागले आहेत. या युध्दामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने राजापूर शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. उपलब्ध असलेले गॅस सिलेंटर संपत आल्याने काहींनी चुलींचा आधार घेतला आहे. मात्र येत्या एक दोन दिवसात हा व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध झाला नाही तर मात्र अनेकांना आपला हॉटेल व्यवसाय बंद करावा लागणार आहे.

याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहेच पण शहरात व ग्रामीण भागात आपल्या कामासाठी येणारी येणारी जनता, शाळकरी विद्यार्थी व मजूरांना बसणार आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा लवकरात लवकर करावा, प्रशासनाने यासाठी काहीतरी उपायोजना करावी अशी मागणी होत आहे.

मध्य पुर्व मध्ये सुरू असलेल्या युध्दाचे परिणाम आता हळू हळू दिसू लागले आहेत. खाद्य तेलासह अन्य काही वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. प्रशासनाकडून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असून ग्राहकांना गॅस बुकिंगच्या नियमावलीप्रमाणे घरगुती गॅस सिलेंटर पुरविले जात आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

मात्र या युध्दामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाच होत नसल्याने याचा फटका आता हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. राजापूर शहरासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातुनच ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असतात. मात्र आता या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवडयामुळे हॉटेल व्यवसाय धोक्यात आला आहे. तालुक्यात सुमारे ४५० ते ५०० इतक्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची नोंद आहे. मात्र गेल्या पंधरा ते विस दिवसात याचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे आता काहींनी तात्पुरत्या स्वरूपात चुलीही पेटवल्या असून त्यावर जेवण केले जात आहे. मात्र अन्य खाद्य पदार्थ, चहा, वडा, भजी यांसारखे पदार्थ बनविण्यासाठी गॅस सिलेंडरचाच आधार घ्यावा लागत आहेत.

आत्तापर्यंत जो गॅस सिलेंडर उपलब्ध होता त्यावर काम चालु होते. मात्र आत तो देखील संपल्याने हॉटेल बंद करण्यावाचून पर्याय उरलेला नाही अशी व्यवासायिकांची अवस्था आहे. ऐन हंगामात ही परिस्थिती निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांचे व्यवसाय हे भाडयांच्या जागेत सुरू असल्याने जरी हॉटेल बंद ठेवले तरी भाडे द्यावेच लागणार आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

काही व्यावसायिकांनी चुलींचा आधार घेतला आहे, मात्र लाकडांचाही प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे हा तात्पुरता उपायही तकालादू ठरणार आहे. त्यातही चुलीवर सगळेच पदार्थ बनविणे शक्य नसल्याने पुन्हा गॅसचा प्रश्न येणारच आहे. त्यामुळे शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
स्पेशल चहा व कॉफी हॉटेल मधून गायब
सध्या शहरात सुरू असलेल्या अनेक हॉटेलमधून स्पेशल चहा व कॉफी हॉटेल मधून गायब झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने आहे तो गॅस पुरवून पुरवून वापरावा लागत आहे. त्यामुळे स्पेशल चहा व कॉफी बनविण्यासाठी वारंवार गॅस पेटवावा लागतो, यात गॅसही संपतो त्यामुळे आता बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी स्पेशल चहा व कॉफी देणे बंद केले आहे.

शासनाकडून ५० टक्के व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची घोषणा पण राजापूरात कधी पोहचणार
शासनाकडून ५० टक्के व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र मोठया शहरांमध्येच एवढी ही व्यावसायिक गॅसची टंचाई आहे की त्यांनाच तो पुरणार की नाही अशी शंका आहे. त्यामुळे हा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा राजापुरात येणार कधी आणि हॉटेल व्यावसायिकांना मिळणार कधी असा व्यावसायिकांचा सवाल आहे.