गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचे बलिदान हे राष्ट्रीय एकात्मतेचे अद्वितीय प्रतिक 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन 

 

पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण 

 

बांदा : प्रवीण परब 

गोव्याला पोर्तुगीज साम्राज्यातून मुक्त करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सत्याग्रही धावून आले. गोवा मुक्तीसाठी त्यांनी पोर्तुगीज शासनाच्या विरोधात संघर्ष केला. प्राणांची आहुती दिली. गोवा मुक्ती संग्रामात हुतात्म्यांचे बलिदान हे राष्ट्रीय एकात्मतेचे अद्वितीय प्रतिक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री ना. राजनाथ सिंह यांनी पत्रादेवी येथे केले.

 

पत्रादेवी येथील ‘हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण ना. राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खा. सदानंद शेठ तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सिंधुदुर्गचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते. शहीदांच्या कुटुंबियांची या ठिकाणी विशेष उपस्थिती होती.

 

ना. राजनाथ सिंह म्हणाले,’ गोव्यात येणे नेहमीच समाधानकारक असते. निवडणुकीच्या काळात आणि अनेक प्रसंगी जाहीर सभांसाठी गोव्यात आलो. परंतु हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करण्याची संधी मिळेल असा विचार मी कधी केला नव्हता. गोवा मुक्ती संग्रामादरम्यान पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यानिमित्ताने मी श्रद्धांजली अर्पण करतो. गोवा मुक्तिसंग्रामात देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभाग घेतला. पत्रादेवी सत्याग्रह हा भारताच्या एकतेचे प्रतिक होता.

 

गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीज राजवटीविरोधात लढण्यासाठी पत्रादेवी येथे देशभरातून हजारो स्वातंत्र्यसैनिक एकत्र आले होते. गोवा मुक्तिसंग्राम हा केवळ गोव्यापुरता मर्यादित नव्हता, तर देशाच्या विविध भागांतील स्वातंत्र्यसैनिकांनी त्यात सहभाग घेतला. पत्रादेवी हुतात्मा स्मृती स्मारकावर गोवा मुक्तिसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत. या हुतात्म्यांचे बलिदान गोव्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत त्यांनी आजचा भारत अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज आहे. आता भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची क्षमता देशात आहे, असे स्पष्ट केले.

 

भारत आज जगात एक विशाल अर्थव्यवस्था म्हणून पाचव्या क्रमांकावर सक्षमपणे उभा आहे. राष्ट्रहित प्रथम हेच आपले मुख्य ध्येय असून जगभरात भारताची ताकद वाढली आहे. गोवा राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने अत्यंत वेगाने प्रवास करत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत गोवा मुक्ती आंदोलनापेक्षा आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक महत्त्व दिले गेले. यामुळेच गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांना काँग्रेसच्या काळात योग्य ती ओळख व सन्मान मिळाला नाही. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातच या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना योग्य तो सन्मान देण्यात आला. महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे हे स्मारक केवळ गोव्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

 

कुडचडे किंवा मडगाव आंदोलनाआधी ऐतिहासिक ‘कुंकळ्ळी बंडापासून’ गोमंतकीयांनी परकीय सत्तेविरुद्धचा लढा सुरू केला होता. गोव्याच्या मुक्तिसंग्रामात सहभागी होण्यासाठी देशभरातून आलेल्या एकत्र जमलेल्या सत्याग्रहींच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. गोव्याच्या मुक्तिसंग्राम लढ्यात निःशस्त्र सत्याग्रहींची पहिली तुकडी पत्रादेवी येथे दाखल झाली होती. शांततापूर्ण सत्याग्रहासाठी भारतभरातून दोन हजारांहून अधिक सत्याग्रही त्या दिवशी पत्रादेवी येथे जमा झाले. पोर्तुगीज सैन्याने या सत्याग्रहींवर केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सुमारे ७७ सत्याग्रहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली.‌ गोवा मुक्तीसाठी आलेले माघारी जाऊ शकले नाही. आज देश अन् गोवा त्यांचे स्मरण करत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.