सावंतवाडी : हृदयरोग आणि मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या एका ७८ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोंदा जाधववाडी येथे उघडकीस आली. नारायण तुकाराम जाधव असे मयत वृद्धाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण जाधव हे गेल्या काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. या सततच्या आजारपणामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या घरातील लोट्यावरील छपराच्या वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती सद्गुरु कृष्णा जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, आरोंदा दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक (ASI) अरवारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, तर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.













