ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा
सावंतवाडी :
शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला मुख्य संशयित सागर कारिवडेकर याच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्यावर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळीच धडक दिली. पोलिसांनी बंगल्याचा पंचनामा करत मालमत्ता जप्त केली असून, या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील सचिन राणे, प्रिती राणे आणि सावंतवाडीतील सागर कारिवडेकर यांनी मिळून एक मोठे रॅकेट चालवल्याचा संशय आहे. त्यांनी शेअर ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले. हे रॅकेट सावंतवाडीसह पुणे आणि ठाण्यासारख्या महानगरांपर्यंत पसरलेले होते. ठाण्यात या घोटाळ्याचा पर्दापाश झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. या पार्श्वभूमीवर आज ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सावंतवाडीत दाखल झाले.
कारिवडेकरचा बंगला बंद असल्याने पोलिसांनी तज्ज्ञाला बोलावून कुलूप तोडले. यावेळी संशयिताचे बंधू उपस्थित होते, त्यांनी या कारवाईवर कोणताही आक्षेप घेतला नाही. स्थानिक सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पथकाने बंगल्याचा पंचनामा केला आणि बंगला सील करून बाहेर जप्तीची नोटीस लावली.
या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५५/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच ‘महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९’ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक सावंतवाडी पोलीस ठाण्यात या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सागर कारिवडेकर याने सावंतवाडीतील उच्चभ्रू वर्गातील अनेक लोकांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढले होते. या घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुणे येथील काही व्यक्तींनी कारिवडेकरच्या बंगल्यावर दगडफेक करत नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सद्यस्थितीत मुख्य संशयित सागर कारिवडेकर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.












