पुण्यात सायबर फसवणूक; डेबिट कार्ड बदलताना निवृत्त अधिकाऱ्याला १८.४५ लाखांचा गंडा

चुकीच्या नंबरवर कॉल केल्याने घडली मोठी फसवणूक
OTP शेअर केल्याने खात्यातील रक्कम काही मिनिटांत गायब

पुण्यात सायबर गुन्ह्याची गंभीर घटना समोर आली असून एका निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल १८.४५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. डेबिट कार्ड बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांनी चुकून फसवणूक करणाऱ्यांशी संपर्क साधला. आरोपींनी विश्वास संपादन करून बँक तपशील आणि OTP मिळवला. काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातील मोठी रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


पुणे : डेबिट कार्ड बदलण्याच्या प्रक्रियेत एका ६७ वर्षीय निवृत्त दूरसंचार कंपनीतील अधिकाऱ्याची सायबर चोरांनी फसवणूक करत १८.४५ लाख रुपये लंपास केले. ही घटना जानेवारी महिन्यात घडली असून पीडिताने ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी प्रहार डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला काही अडचणींमुळे त्याचे डेबिट कार्ड बदलायचे होते. त्यासाठी त्याने बँकेशी संपर्क साधला असता त्याला एक टोल फ्री क्रमांक देण्यात आला.

मात्र तक्रारदाराने चुकून चुकीचा नंबर डायल केला, जो एका अज्ञात व्यक्तीने उचलला. त्या व्यक्तीने दुसरा मोबाईल नंबर देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्या नंबरवर संपर्क साधल्यावर आरोपींनी नवीन डेबिट कार्ड मिळवून देण्याचे सांगितले.

विश्वास संपादन करत आरोपींनी तक्रारदाराकडून बँक खात्याची सर्व माहिती घेतली. यानंतर त्यांनी वन टाइम पासवर्ड (OTP) मागितला आणि तो मिळताच काही मिनिटांतच खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले. बँकेकडून आलेल्या संदेशांमधून ही फसवणूक उघडकीस आली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडिताच्या खात्यातून १८.४५ लाख रुपये काढले आहेत. या व्यवहारांची माहिती संबंधित बँकेकडून मागवण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.