पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कारने डिव्हायडर ओलांडून बसला दिली समोरासमोर धडक
अपघातात दोघे जखमी; महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंचरजवळ रात्री उशिरा कारने नियंत्रण गमावून विरुद्ध लेनमध्ये जाऊन खासगी बसला धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ रविवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. कारने अचानक नियंत्रण गमावून डिव्हायडर ओलांडला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला समोरून धडक दिली.

मृतांमध्ये वास्तुविशारद मल्लिकार्जुन आंबेगावे (४६), त्यांची पत्नी आरती आंबेगावे (४३) आणि सासू लता तुपोंढे (६३) यांचा समावेश आहे. हे सर्व चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील रहिवासी होते. या अपघातात त्यांचा मुलगा प्रेम (२०) आणि मुलगी मृणाल (१६) जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी प्रहार डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, आंबेगावे कुटुंब नाशिकमधील कार्यक्रम आटोपून सेडान कारने घरी परतत होते. एकलहरे गावाजवळ पुलाच्या उतारावर कारचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले.

कार प्रथम मध्यभागी आदळून डिव्हायडर ओलांडत विरुद्ध लेनमध्ये गेली आणि धुळे दिशेने जाणाऱ्या खासगी बसला धडकली. धडकेनंतर बसने कार काही अंतर ओढत नेल्याचे साक्षीदारांनी सांगितले.

अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी त्वरित अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बस चालकाने तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

मल्लिकार्जुन आंबेगावे हे वास्तुविशारद असून बांधकाम व्यवसायातही कार्यरत होते. त्यांचा मुलगा प्रेम आर्किटेक्चरचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी मृणालने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.