▪️’वनराई’ संस्थेचे पाठबळ आणि पाच शेतकऱ्यांची वज्रमूठ
▪️वयाच्या ‘साठी’ तही ‘त्यांची ‘ जिद्द कायम
मसुरे | झुंजार पेडणेकर : वय हे केवळ एक आकडा असतो, हे जिद्दीच्या जोरावर सिद्ध करणारे अनेक जण आपण पाहतो. पण जेव्हा एखादा ज्येष्ठ नागरिक साठी ओलांडल्यानंतरही युवकांना सोबतीला घेऊन शेतात राबून ‘कलिंगडाचं’ गोड पीक घेतो, तेव्हा ती केवळ शेती राहत नाही, तर तो एक जगण्याचा धडा ठरतो. आजच्या तरुण पिढीला ‘शेती परवडत नाही’ असं वाटत असतानाच मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथील देविदास सुर्वे आणि गणू परब या दोन जेष्ठ नागरिकांनी इतर तीन युवकांना सोबत घेऊन आपल्या कष्टाने आणि अनुभवाने मातीतून मिळवलेल्या या उत्पन्नाची ही रंजक आणि प्रेरणादायी सक्सेस स्टोरी आहे.
▪️पुण्याच्या वनराई संस्थेचे आर्थिक सहकार्य
आपल्या या कलिंगड शेती बद्दल माहिती देताना हडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष असलेले देविदास सुर्वे सांगतात की, पुणे येथील वनराई संस्था आपल्या मालवण तालुक्यात काम करत आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की गावच्या लोकांनी गट शेती करावी आणि आंबा आणि काजू या पिकावर अवलंबून न राहता इतर पिकांमध्ये सुद्धा लक्ष घालावं. त्यातून नफा कमवावा आणि यासाठी लागणारे पूर्ण आर्थिक सहकार्य ही संस्था करते. हडी गावांमध्ये प्रथमच कलिंगड लागवडीचा प्रयोग करावा असं या संस्थेच्या वतीने सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुचविण्यात आले. त्यासाठी लागवड पूर्व शेतीची मशागत करण्यासाठी खर्च, प्लास्टिक मल्चिंग पसरणे, ठिबक सिंचन, रोपांसाठी आणि खतांसाठी लागणारा खर्च या संस्थेच्या वतीने सुर्वे यांना पुरविण्यात आला. सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे चांगलं पीक हाती आल्याचं सुर्वे सांगतात
▪️वीस गुंठ्यात 2400 रोपांची लागवड
9 जानेवारी 2026 रोजी 70 दिवसात तयार होणाऱ्या ‘ ऑगस्टा ‘ या जातीच्या कलिंगडाच्या रोपांची निवड त्यांनी केली. एकूण वीस गुंठे क्षेत्रावर जवळपास 2400 रोपांची लागवड त्यांनी या ठिकाणी केली आहे. ही जमीन सुद्धा त्यांनी दुसऱ्याकडून भाड्याने घेतली आहे. वनराई संस्था पुणेचे संस्थापक मोहन धारिया हे असून या कलिंगड लागवडीसाठी वनराई संस्था पुणेचे श्री धारिया, निलेश तेजम, ऋषिकेश दुदम, श्री पेडणेकर, श्री म्हापणकर यांचे मार्गदर्शन लाभले असे देविदास सुर्वे सांगतात. या कलिंगड शेतीसाठी सुर्वे यांना दिनेश सुर्वे, गणू परब, संजय सावंत, राजन सुर्वे या चार शेतकऱ्यांची मदत लाभली आणि या पाच जणानी ही शेती करून गटशेतीने सुद्धा कशा पद्धतीने यश मिळू शकते हे आपणासमोर स्पष्ट केले आहे. सध्या सुर्वे यांनी आपल्या कलिंगड लागवडीच्या शेतीलगतच कलिंगड विक्रीचा स्टॉल लावला असून सध्या 20 रुपये किलोने ही कलिंगड विक्री होत आहे. योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे त्यांना प्रत्येक नग चार ते सात किलोचा मिळाला आहे.
▪️स्वतःची विक्री व्यवस्था
होलसेल व्यापारी सुद्धा त्यांच्याकडे कलिंगड चौकशीसाठी येत असून हे व्यापारी कमी दर करून मागत असल्यामुळे या व्यापाऱ्यांना ही कलिंगड विक्री न करता ते स्वतः या कलिंगडाची विक्री करणार आहेत. संपूर्ण खर्च हा वनराई संस्थेने केल्यामुळे जो नफा होणार आहे तो शंभर टक्के नफा या शेतकऱ्यांचा होणार आहे. वानरांपासून संरक्षण करण्यासाठी मोठी जाळी त्यांनी लावल्यामुळे चांगलं पीक हाती आल्याचं सुर्वे सांगतात. या कलिंगड शेतीला पाणीपुरवठ्यासाठी जमीन मालकांच्या बोअरवेलच्या पाण्याचा वापर त्यांनी केला. त्यामुळे तो सुद्धा खर्च त्यांना आलेला नाही.
▪️नियोजनात्मक शेतीतून नफा निश्चित
कलिंगड तोडणीचा मुहूर्त करताना हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, हडी ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक चंद्रकांत पाटकर, ज्येष्ठ ग्रामस्थ विजय सुर्वे आणि शेतकरी उपस्थित होते.शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्साह आणि योग्य नियोजनाची गरज असते. हेच ओळखून हडी येथील जेष्ठ नागरिक सुर्वे आणि इतर चार जणांच्या अनुभवी हातांनी यंदा कलिंगड शेतीचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत, वयाच्या या टप्प्यावर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कलिंगडाचे जे भरघोस उत्पन्न मिळवले आहे, ते पाहता ‘नियोजन असेल तर शेती हा नक्कीच नफ्याचा व्यवसाय आहे’ हे त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे.












