सिंधुनगरी l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडीत महायुतीने पुन्हा एकदा एकमताचे दर्शन घडवत चार सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये महिला व बालकल्याण सभापतीपदी श्रीमती अनुराधा महेशकुमार नारकर पोभुर्ले (भाजपा) व समाजकल्याण सभापतीपदी श्रीमती रुहिता तांबे, (शिंदेसेना,जाणवली), तर अन्य सभापती पदी श्री संतोष वसंत साठविलकर (शिंदे शिवसेना पेंडुर), श्री प्रितेश शंकर राऊळ (भाजपा रेडी ), यांची जि.प. विषय समिती सभापतीपदी बिनविरोध निवड बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत पार पडली.
जिल्हा परिषद सदस्यांच्या या विशेष बैठकीला पिठासन अधिकारी म्हणून महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पोवार यांच्या उपस्थिती सभापती निवड प्रक्रिया पार पडली. या सभेच्या व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष श्री प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब व सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
महायुतीच्या ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार भाजप-शिवसेना नेतृत्वाने या चार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना सभापती पदावर संधी दिली. अनुभवी व नव्या चेहऱ्यांचा समतोल साधत दोन अनुभवी तसेच दोन नवोदित सदस्यांकडे विविध विषय समित्यांची जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयामुळे प्रशासनात अनुभवासोबतच नव्या उर्जेची जोड मिळणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींची ही नवी टीम आजपासून जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सज्ज झाली असून, जिल्हावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कामाला लागली आहे.











