लांजा येथील शेतकरी महेश सप्रे यांची मागणी, तहसीलदारांशी सकारात्मक चर्चा
लांजा (प्रतिनिधी) :सध्याच्या काजू आणि आंबा हंगामामुळे तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी, बागायतदारांना पेट्रोल पंपावर प्राधान्याने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध व्हावे या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी येथील शेतकरी आणि काँग्रेसचे पदाधिकारी महेश सप्रे यांनी केली आहे.
सध्या तालुक्यात आंबा आणि काजूचा हंगाम सुरू आहे. सध्या यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरची टंचाई भासत आहे. त्यात वारंवार दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा देखील खंडित होत आहे. यामुळे तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी, बागायतदार आणि व्यापारी हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आंबा आणि काजू पिकावर फवारणीसाठी फवारणी पंप खरेदी केलेले आहेत. त्यासाठी त्यांना पेट्रोल किंवा डिझेल ची आवश्यकता भासते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी पाण्याचे पंप देखील बसविले आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांना देखील अशावेळी पंप चालू करण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता भासते.
असे शेतकरी पेट्रोल पंपावर कॅन घेऊन गेल्यास त्यांना त्या ठिकाणी कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल दिले जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याचा हंगाम लक्षात घेता प्रशासनाने आंबा व काजू उत्पादक शेतकरी, बागायतदार यांना प्राधान्याने पेट्रोल पंपावर कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्यात यावे, अशी मागणी महेश सप्रे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांची भेट घेऊन त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि याबाबत प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी अशी मागणी देखील केली.
दरम्यान आंबा व काजू शेतकऱ्यांची पेट्रोल- डिझेल अभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपण योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन देखील तहसीलदार ढोले यांनी दिल्याचे महेश सप्रे यांनी सांगितले.












