संगमेश्वर: सोनवडे आणि पांगरी गावात वीज पडली

सुदैवाने जीवितहानी नाही; तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

देवरूख (प्रतिनिधी) : 

संगमेश्वर तालुक्यात गुरूवारी अवकाळी पावसादरम्यान सोनवडे आणि पांगरी गावात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​सोनवडे येथील रहिवासी गजानन सनगरे यांच्या घरावर वीज कोसळली. या घटनेच्या वेळी घरातील सदस्य सुरक्षित राहिले, मात्र विजेचा झटका इतका तीव्र होता की घराचे वीज मीटर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. ​दुसरी घटना पांगरी येथे घडली. येथील सचिन घडशी यांच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली. वीज पडल्यामुळे झाडाचे मोठे नुकसान झाले असून झाडाने पेट घेतला होता. घराच्या अगदी जवळ वीज पडल्याने घडशी कुटुंब थोडक्यात बचावले. ​या दोन्ही घटनांमध्ये केवळ किरकोळ हानी झाली असून जीवितहानी टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.