कोमसाप सिंधुदुर्ग मंडळाची साहित्य चळवळ अधिक प्रगल्भ करा: पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आवाहन

​सावंतवाडी विश्रामगृहावर जिल्हा कार्यकारीणीची बैठक; ऑनलाईन गुरुवंदना

विविध पुरस्कारार्थींचा सन्मान आणि आगामी उपक्रमांचे नियोजन

​सावंतवाडी प्रतिनिधी:
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग मंडळाचे कार्य अत्यंत उत्तम सुरू असून ही साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे आणि वेगाने पुढे नेण्याची गरज आहे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत, अशा शब्दांत कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित कोमसाप सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यकारीणी बैठकीत ते ऑनलाईन माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत होते.
​बुधवारी सावंतवाडी येथे कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ऑनलाईन गुरुवंदना देण्यात आली. या प्रसंगी बोलताना कर्णिक म्हणाले की, गुरुपौर्णिमेनिमित्त मिळालेल्या या शुभेच्छा म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांचीच भेट आहे. मुंबईत असताना मला ही वाङ्मयीन भेट मिळाली असून सिंधुदुर्गात साहित्य चळवळ वेगाने विस्तारत आहे. मराठी भाषा आणि साहित्याचे विविध उपक्रम सातत्याने राबवून ही चळवळ अधिक प्रगल्भ करावी, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

​यावेळी कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोमसापच्या माध्यमातून दर्जेदार काम सुरू असून संस्थेला शासन स्तरावरूनही चांगले सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. अमराठी बांधवांना मराठी भाषेचे ज्ञान व धडे देण्याच्या विशेष उपक्रमाचा समारोप येत्या १७ ऑगस्ट रोजी ठाणे येथे होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच लवकरच कोकणात कोमसापचे भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

​बैठकीदरम्यान विशेष सत्कार सोहळा पार पडला. ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते तथा कोमसापचे जिल्हा खजिनदार आनंद वैद्य आणि जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांचा पाईप क्लिंजरने तयार केलेला वैशिष्ट्यपूर्ण पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. हा आगळावेगळा पुष्पगुच्छ साकारल्याबद्दल काव्य सावंत हिचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीचा अहवाल वाचन केला. अध्यक्षीय भाषणात मंगेश म्हस्के म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे आमचे गुरुवर्य असून त्यांच्या प्रेरणेनेच ही चळवळ व्यापक रूप धारण करत आहे. त्यांनी दिलेले आशीर्वाद आम्हा सर्व साहित्यिकांसाठी ऊर्जा देणारे आहेत.

​विविध उपक्रम आणि शाखा पुनर्जीवनाचा संकल्प
या बैठकीत जिल्ह्यातील साहित्य चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लवकरच कुडाळ येथे जिल्ह्यातील साहित्यिक व लेखकांच्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरवण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय आगामी काळात जिल्हा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन आणि विविध साहित्यिक उपक्रम राबवण्यावर सविस्तर चर्चा झाली. दोडामार्ग, वेंगुर्ले आणि देवगड या निष्क्रिय झालेल्या शाखांचे पुनर्जीवन करणे आणि जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करून कोमसापची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

​या बैठकीला कोमसापचे प्रांतिक सदस्य रुजारिओ पिंटो, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे, सहसचिव सुरेश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहसचिव सुरेश पवार यांनी मानले.