सुकांत सावंतच्या घराजवळून जप्त केलेले मानवी अवशेष हे स्वप्नाली सावंतचेच

डिएनए अहवाल पोलिसांना प्राप्त

रत्नागिरी ः प्रतिनिधी : सुकांत सावंतच्या घराजवळून जप्त केलेले मानवी अवशेष हे स्वप्नाली सावंतचेच असल्याचा डिएनए अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.त्यामुळे सरकारी पक्षाची बाजु मजबुत झाली असून या गुन्ह्याच्या निकालाकडे स्वप्नालीच्या नातेवाईंकाचे लक्ष लागून राहिले आहे.सुकांत सावंत याने रुपेश उर्फ छोटा भाई सावंत आणि पम्या उर्फ प्रमोद गावणंग या दोघांच्या मदतीने 1 सप्टेंबर 2022 रोजी मिर्‍याबंदर येथील आपल्या घरी प्रथम दोरीने गळा आवळून स्वप्नाली सावंतचा खून केला.

त्यानंतर तिचा मृतदेह पेंढयामध्ये दिवसभर झाकून संध्याकाळी घराबाहेर पेंढा आणि पेट्रोल टाकून जाळला होता.मृतदेह जाळल्यानंतर उरलेली राख तसेच त्याठिकाणचा कोबा 20 गोण्यांमध्ये भरुन दुचाकीवरुन समुद्रात नेउन टाकला होता.दरम्यान,याप्रकरणी स्वप्नालीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी सुकांत सावंत आणि त्याच्या साथिदारांना अटक करुन घराची झडती घेतल्यानंतर घराबाहेरच्या आवारात त्यांना 7 ते 8 मानवी हाडे, कुजलेल्या अवस्थेतील मांस आणि एक दाम मिळून आला होता. पोलिसांनी स्वप्नालीच्या मुलीच्या डीएनएसोबत हा डिएनए मॅच करण्यासाठी पाठवलेला होता.हे दोन्ही डीएनए मॅच झाल्याचा अहवाल शहर पोलिसांना आता प्राप्त झाला आहे