५ कोटी ०७ लाख रुपये येवढ्या किमतीच्या व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या विरुदध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

तब्बल 5 कोटी 7 लाख रुपये किमतिच्या व्हेल माशाच्या उलटी सह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दोन संशयतांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे करण्यात आली आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरीता विविध योजना व कायदे तयार करण्यात आलेले आहेत. वन्य जीवाचे संरक्षणाकरीता शासकीय यंत्रणा नेहमीच प्रयत्न करीत असतात. परंतु काही समाज कंटक स्वतःचे आर्थिक लाभाकरीता संरक्षित प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करीत असल्याने त्यावर आळा घालण्याकरीता पोलीस दल तसेच वन विभागाकडून विशेष प्रयत्न करुन वेळोवेळी कारवाया करण्यात येतात.

सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक दृष्टया संपन्न असुन येथील समुद्र किनारे जलचराने समृदध आहेत. त्याचा फायदा पर्यटनासाठी होत आहे. परंतु समुद्रामध्ये वावरणाऱ्या संरक्षित जलचरांच्या अवयवांची तस्करी करण्याचा प्रयत्न काहींकडून होत असतो. यास प्रतिबंध करण्याकरीता परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले होते.

दिनांक ०७.०५.२०२४ रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी या ठिकाणी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्री करण्यासाठी आणून ठेवली असल्याची माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहीतीची खातरजमा करुन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने तारकर्ली, वरचीवाडी ता. मालवण येथे सापळा रचुन एका संशईत इसमाला ताब्यात घेवुन त्याने राहत्या घराच्या बाजूला लपवून ठेवलेली ५ किलो ०७० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दराप्रमाणे सदर व्हेल माशाच्या उलटीची किंमत ५ कोटी ०७ लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कारवाईमध्ये आणखीन एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींविरुध्द मालवण पोलीस ठाण्यात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याकडून सुरु आहे.

सदरची कारवाई सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली हेमचंद्र खोपडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, रामचंद्र शेळके, श्रेणी पोलीस उप निरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे यांनी केलेली आहे