मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे केले आयोजन
देवगड | हिंदू समाजात एकात्मता, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक एकोपा वाढवण्याच्या उद्देशाने जामसंडे येथे ‘सकल हिंदू संमेलन’ाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, यानिमित्त सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात जामसंडे येथील टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाचे संयोजक विलास रूमडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगड तालुका कार्यवाह महेश कानेटकर तसेच सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा सचिव जयेश खाडिलकर यांनी माहिती दिली. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत हिंदू समाजाची संघटना अधिक बळकट करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शुभम रणजीत पाटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून समाजप्रबोधन आणि राष्ट्रभावनेचा संदेश दिला जाणार आहे.
सायंकाळी ४ वाजता निघणारी शोभायात्रा जामसंडे परिसरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार असून, यात ढोल-ताशा पथके, भगवे ध्वज आणि विविध सांस्कृतिक देखावे आकर्षण ठरणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन व शोभायात्रा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












