शिरोडा येथील दर्शन गडेकर याच्यावर कारवाई करा : ग्रामस्थांची वेंगुर्ले पोलिसांकडे मागणी 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

शिरोडा गावातील दर्शन गडेकर यास तात्काळ अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी शिरोड्यातील ग्रामस्थांनी आज शुक्रवारी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला धडक दिली. याबाबत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याशी चर्चा करून गडेकर यास अटक करण्याची मागणी केली. येत्या २ दिवसात यावर योग्य कारवाई न झाल्यास याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाद मागू असे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.

शिरोड्यात २६ मार्च रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान तेथील चायनिक सेंटर येथे दोन गटात जोरदार मारहाण झाली. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या मारहाणीत बबलू परब याला दर्शन गडेकर व भूषण गडेकर यांनी जबर मारहाण केल्याने बबलू परब यास मोठी दुखापत झाली. हे मारहाण प्रकरण आता जोरदार तापले आहे. या मारहाण प्रकरणी दर्शन गडेकर याला अटक करण्याच्या मागणीसाठी शिरोडा ग्रामस्थांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला धडक दिली.

यावेळी शिरोडा ग्रामस्थ अमोल परब, दत्तगुरु परब, मयुरेश शिरोडकर, भिवा गावडे, भरत शेटये, राहुल गावडे, अमित गावडे, कौशिक परब, गणपत साळगावकर, प्रशांत गावडे, देऊ परब, दीक्षांत परब, विजय परब, उद्धव परब, सचिन जेठे, वेदांत परब, निखिल गावडे, ओम परब, आदित्य घोडके आदी उपस्थित होते. या निवेदनात असे म्हटले आहे की, शिरोडा गावातील दर्शन गडेकर हा गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असून या अगोदर शिरोडा परिसरामध्ये मध्ये त्याने गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याने चायनीज हॉटेल मध्ये श्रीनाथ (बबलू) परब नावाच्या व्यक्तीस मारहाण केली. तसेच परब याला कायम संपवण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर वार केले आहेत. या मारहाणीत बबलू परब यांच्या डोक्याला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात १७ टाके घालण्यात आले आहेत.

तसेच दर्शन गडेकर हा व्यक्ती मारहाण केल्यानंतर स्वतःच समोरच्या व्यक्तीवर केसेस दाखल करतो. हा व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये दारूचा व्यवसाय करीत असतो. तर शेजाऱ्यांना कायम त्रास देत असतो. तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.