प्रतिनिधी/ रोहन कांबळे
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर धडक कारवाई केली आहे.
राज्यातील विविध ठिकाणी एफडीएने आवश्यक परवाने नसणे, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया, निकृष्ट दर्जाचे पाणी, प्रयोगशाळेच्या चाचण्यांतील त्रुटी आणि एफएसएसएआयच्या नियमांचे उल्लंघन आढळून आलेल्या प्रकल्पांवर कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा पॅकेज्ड पाण्याचा साठा जप्त करण्यात आला असून, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
या अचानक तपासणीमुळे अनेकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शिरोळ तालुक्यातील अनेक लहान मोठे पाणी शुद्धीकरण प्रकल्पही एफडीएच्या रडारवर आले आहेत. व्यवसायाबाबत पाणी तपासणी अहवाल आणि कडक निर्बंधामुळे तालुक्यातील अनेक प्रकल्प चालकांचे धाबे दणाणले असून, लवकरच तपासणी मोहीम राबविली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान,या प्रकल्पांकडे आवश्यक परवाने, एफएसएसएआय नोंदणी, स्वच्छता, पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी आणि उत्पादन प्रक्रियेचे निकष पाळले जात आहेत का, याची तपासणी होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.











