क्रेडिट कार्डच्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४.८० लाखांची फसवणूक

अनोळखी कॉलमधून बनावट योजना सांगून लिंक पाठवली
तपशील भरताच खात्यातून लाखोंची रक्कम गायब

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ३१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डच्या संरक्षण योजनेच्या नावाखाली संपर्क साधून त्याला फसवले. योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या लिंकवर माहिती भरल्यानंतर मोठी रक्कम खात्यातून काढण्यात आली. या प्रकरणात सुमारे ४.८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पीडिताने अखेर पोलिसांकडे धाव घेतली असून तपास सुरू आहे.


पुणे : क्रेडिट कार्डच्या आमिषाने वारजे माळवाडी येथील ३१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची सायबर चोरट्याने तब्बल ४.८० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक जानेवारी महिन्यात घडली होती. याप्रकरणी गुरुवारी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये तक्रारदाराला अनोळखी नंबरवरून फोन आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने क्रेडिट कार्डची संरक्षण योजना कालबाह्य होणार असल्याचे सांगत संभाषण सुरू केले.

तक्रारदाराने अशा कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला नसल्याचे सांगितले असता, कॉलरने बँकेने काही व्यवहार नाकारल्यामुळे योजना सक्रिय केली असल्याचे सांगितले. तसेच योजना रद्द न केल्यास ३,९९९ रुपये खात्यातून वजा होतील अशी भीतीही दाखवली.

यानंतर कॉलरने योजना रद्द करण्यासाठी एक लिंक पाठवली. तक्रारदाराने त्या लिंकवर जाऊन विचारलेली सर्व माहिती भरली. काही वेळातच त्याला क्रेडिट कार्डद्वारे ४.७८ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा मेसेज प्राप्त झाला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.