१६०० मीटर शर्यतीत अचानक कोसळला युवक
ससून रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
पुण्यात कारागृह विभागातील भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. २३ वर्षीय इच्छुक युवकाचा १६०० मीटर धावण्याच्या चाचणीदरम्यान अचानक मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर येथील पोलिस कवायत मैदानावर घडली. युवक शेवटच्या फेरीत धावत असताना अचानक कोसळला. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुणे : राज्य कारागृह विभागात पहारेकरी पदासाठी भरती प्रक्रियेदरम्यान २३ वर्षीय इच्छुक युवकाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर पोलिस कवायत मैदानावर शनिवारी सकाळी सुमारे ९.२५ वाजता घडली.
पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत युवकाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांकडून कारागृह रक्षक पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जात होती.
अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, युवकाने ४०० मीटरच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या आणि १६०० मीटर शर्यतीची शेवटची फेरी धावत असताना तो अचानक खाली कोसळला.
घटनेनंतर त्याला तातडीने ससून सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
रुग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआर देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.











