कणकवली पोलिसात गुन्हा दाखल.!
कणकवली : तालुक्यातील कसवण सुतारवाडी येथे पाण्याच्या पाईपवरून झालेल्या किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली असून, या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी सुमारे ८:३० वा. च्या सुमारास हनुमंत लक्ष्मण मेस्त्री (वय ५२) हे आपल्या रिक्षाने कामावर जात असताना रस्त्यावर टाकलेल्या पाईपवरून त्यांची गाडी गेली. त्यामुळे पाईप जॉईंटमधून सुटल्याचा राग आरोपी गणपत जगन्नाथ मेस्त्री (वय ६२, रा. कसवण सुतारवाडी) यांनी मनात धरला. यानंतर आरोपीने हनुमंत मेस्त्री यांच्या रिक्षावर लाकडी दांड्याने मारून नुकसान केले. हनुमंत मेस्त्री यांनी गाडी थांबवताच आरोपीने त्यांच्यावरही दांड्याने हल्ला करून दुखापत केली. हनुमंत मेस्त्री यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या पत्नी घटनास्थळी आल्या असता आरोपीने त्यांनाही मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३२४(२), ३२५, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करीत आहेत.












