मसुरे | झुंजार पेडणेकर सुमारे 50 ते 60 फूट खोल असलेल्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला सुखरूप बाहेर काढण्यात मालवण देऊळवाडा आडवण येथील ग्रामस्थांना यश आले. कठडा नसलेल्या विहिरीमध्ये सदर म्हैस पडल्याचे लक्षात आल्यानंतर कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे सदस्य सर्पमित्र स्वप्नील परुळेकर आणि आनंद बांबर्डेकर यांनी विहिरीच्या ठिकाणी धाव घेत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. परुळेकर यांनी विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला असता वीहिर खोल असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनची गरज भासू लागली. त्यामुळे तात्काळ ऑक्सिजन सिलेंडर मागवून ऑक्सिजनचे मास्क लावून परुळेकर हे विहिरीत उतरले व म्हशीला दोरीने बांधले. ग्रामस्थांनी वाईल्ड रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मार्गदर्शनाखाली या म्हशीला दोरीच्या साह्याने खेचून विहिरीबाहेर काढले. यावेळी समाजसेवक श्री लुडबे, समाजसेविका शिल्पा खोत यांनी सुद्धा सहकार्य केले. म्हशीला जीवदान मिळाल्यामुळे वाइल्ड रेस्क्यू टीमचे अभिनंदन होत आहे.












