हॉटेल व्यावसायिकांचा एल्गार, व्यवसाय बंद करण्याचा इशारा!
रत्नागिरी:
रत्नागिरी शहर आणि तालुका परिसरात गेल्या १५ दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र संकटात सापडले आहेत. सिलिंडरच्या या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हॉटेल मालक, कामगार आणि पर्यटकांची मोठी कोंडी झाली असून, अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आज रत्नागिरीतील हॉटेल लँडमार्क येथे हॉटेल व्यावसायिकांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत व्यावसायिकांनी प्रशासकीय यंत्रणा आणि गॅस एजन्सींविरुद्ध आपला तीव्र संताप व्यक्त केला.
हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच राज्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गॅस वितरण सुरळीत करण्याची विनंती केली होती. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तातडीची गरज असलेल्या ८० हॉटेल व्यावसायिकांची यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली होती. मात्र, पुरवठा साखळीतील गोंधळामुळे यातील केवळ २५ ते ३० जणांनाच सिलिंडर मिळाले असून, उर्वरित ५० हून अधिक व्यावसायिक आजही प्रतीक्षेत आहेत. शहरात दररोज सुमारे २०० सिलिंडरची गरज असताना गॅस एजन्सींकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. एका सिलिंडरवर दिवसभराचा व्यवसाय कसा करायचा, असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी विचारला आहे.
गॅस टंचाईला पर्याय म्हणून अनेक हॉटेल मालकांनी महागड्या डिझेल शेगड्या खरेदी केल्या आहेत, परंतु पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी व्यावसायिकांची अवस्था झाली आहे. सध्या कोकणात पर्यटनाचा आणि हापूस आंब्याचा हंगाम सुरू होत असतानाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटकांची सोय कशी करायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांना किमान आठवड्याला ३ सिलिंडर मिळावेत, अशी आग्रही मागणी या सभेत करण्यात आली. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मदत न केल्यास हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यासंदर्भातील सविस्तर निवेदन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना देण्यात येणार आहे. आजच्या या सभेला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई यांच्यासह शहर व तालुक्यातील १०० हून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.












