तुतारीच्या सान्निध्यात रंगला कवी दीपक पटेकर यांचा ग्रंथप्रकाशन सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
दक्षिण कोकणचा निसर्ग आणि कविता यांचे अद्वैत नाते असून, याचेच प्रतिबिंब कवी दीपक पटेकर यांच्या ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहात उमटले आहे.
एक प्रकारे ही फुले या काव्यसंग्रहातच उमलली आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे यांनी काढले.
सावंतवाडीतील ऐतिहासिक केशवसुत कट्ट्यावर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात पटेकर यांच्या ‘बकुळीची फुले ‘ या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सावंतवाडीतील एस. पी. के. महाविद्यालयात घालवलेल्या १७ वर्षांच्या स्मृतींना उजाळा देताना डॉ. देशपांडे पुढे म्हणाले की, “कविता लिहिणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही. शब्दांना आपल्या मुठीत पकडण्याचे कसब कवीला साधावे लागते. आजच्या छंदमुक्त कवितेच्या लाटेत पटेकर यांनी जाणीवपूर्वक वृत्तबद्ध काव्य जोपासले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. जुन्या कवींच्या खांद्यावर उभे राहून नवे कवी आजचे जग पाहत आहेत, अशा शब्दांत त्यांनी परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
*पटेकर यांच्यात दडलेला एक उत्तम गीतकार – विनय सौदागर*
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मालवणी कवी विनय सौदागर यांनी भूषवले. पटेकर यांच्या लेखनावर भाष्य करताना ते म्हणाले की, “दीपक पटेकर यांच्याकडे यमकांची मोठी विपुलता असून, त्यांच्या रचनेत एक सिद्धहस्त गीतकार दडलेला आहे. निसर्ग, प्रेम आणि सामाजिक विषयांची त्यांनी केलेली मांडणी अत्यंत सोपी आणि थेट काळजाला भिडणारी आहे, अशा शब्दांत त्यांनी कवी दीपक पटेकर यांच्या काव्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, साहित्यिका सौ. उषा परब, भरत गावडे आणि अनिल भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे डॉ. देशपांडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
*काव्यप्रवासाचा उलगडा*
स्वतःच्या काव्यप्रवासाचा उलगडा करताना कवी दीपक पटेकर भावूक झाले. “मुक्तच्छंदाकडून वृत्तबद्ध कवितेकडे वळताना झालेला प्रवास विलक्षण होता,” असे सांगत त्यांनी आपले काव्यगुरू विजय जोशी (विजो), मार्गदर्शक जी. ए. बुवा आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्याला सावंतवाडी आणि परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यात दादा मडकईकर, संतोष वालावलकर, प्रा. सुरेश म्हसकर, वैशाली सावंत, डॉ. सुनील परब यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू तावडे यांनी केले.













