आषाढी एकादशी निमित्त निरवडेत वृक्षारोपण; हरिनामाच्या गजरात साजरा उत्सव

सावंतवाडी | प्रतिनिधी :  देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत निरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुहानी गावडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विठोबा-रखुमाईप्रती भक्तीभाव व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. हरिनामाच्या जयघोषात झालेल्या या उपक्रमात पोलीस पाटील अजित वैज, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण बाईत, सुहास गावडे, उमाकांत गावडे, भदू जाधव, ऋषीकेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

याच कार्यक्रमात ‘संस्कार नॅशनल इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईवर आधारित सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. पर्यावरण संरक्षणासह सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारे असे समाजोपयोगी आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात निरवडे ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.