पाच विद्युत पंप जप्त, यापुढेही कारवाई सुरूच रहाणार- पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांची माहिती
राजापूर प्रतिनिधी: शहरात पाणीपुरवा करणऱ्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या विद्युत पंप बसवून होणाऱ्या पाणीचोरीच्या विरोधात राजापूर नगर परिषदेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत अशा प्रकारे मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आले आहेत. तशी माहती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली आहे. भविष्यामध्ये ही धडक कारवाई कायम सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी नगर परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा प्रकारे पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा सभापती खडपे यांनी यापुर्वीच दिला होता. त्याची आता प्रत्यक्ष कार्यवाही करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरप परिषद प्रशासनातर्फे बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई केली जात आहे. त्यादृष्टीने शहरात सर्व्हेक्षण करीत असताना बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी करणारे पाच पंप थेट जप्त करण्यात आल्याची माहिती खडपे यांनी दिली. पाणीचोरीच्या विरोधातील धडक कारवाई भविष्यामध्ये कायम सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
गेल्या काही दिवसांपासून हवेतील उष्मा कमालीचा वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम जलसाठ्यावर होवून पाणीटंचाईची झळा पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब लक्षात घेवून नगर परिषद प्रशासनाकडून आतापासून पाणीटंचाईतील उपाययोजनांचे नियोजन केल्याची माहिती खडपे यांनी दिली. त्यामध्ये विंधन विहीरी, विहीरी, तळी यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अशा प्रकारे मुख्य जलवाहिनीवर विद्युत पंप बसवून पाणी चोरी करणाऱ्यांना दणका दिल्याने या कारवाईचे स्वागत होत आहे.