​सावंतवाडीमध्ये ‘घे भरारी फाऊंडेशन’च्या वतीने ‘गरबा नाईट्स’चे आयोजन; महिलांना विविध बक्षिसांची संधी

​सावंतवाडी: ‘घे भरारी फाऊंडेशन सावंतवाडी’च्या वतीने महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त विशेष ‘गरबा नाईट्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता नवरांग कलामंच, आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे. महिलांना पारंपरिक गरबा नृत्याचा आनंद घेण्यासाठी आणि विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळावी हा या आयोजनाचा उद्देश आहे.

​या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला व मुलींसाठी अनेक स्पर्धा आणि बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यात ‘बेस्ट डांसर’, ‘बेस्ट कॉस्ट्यूम’, ‘बेस्ट एनर्जीक परफॉर्मन्स’, ‘बेस्ट हेअर स्टाईल’, ‘स्टॅमिना प्राईज’ आणि ‘ज्येष्ठ महिला परफॉर्मन्स’ यांसारख्या श्रेणींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, कार्यक्रमात लकी ड्रॉ देखील काढला जाणार असून, त्यात सोन्याची नथ, एक ग्रॅम दागिना, मोत्याचे दागिने आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

​या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘घे भरारी फाऊंडेशन’च्या संस्थापिका सौ. मोहिनी मडगांवकर, अध्यक्षा सौ. रेखा कुमठेकर, कार्याध्यक्षा सौ. मेघना राऊळ, उपाध्यक्षा सौ. संध्या पवार, सेक्रेटरी सौ. सलोनी वंजारी आणि खजिनदार सौ. स्वप्नाली कारेकर यांच्यासह सर्व संचालिका सहभागी आहेत. संस्थेने सर्व महिला व नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.