“नेतर्डेच्या मातीचा मान वाढला… आपल्या माणसासाठी गाव एकवटलं”

सिंधुनगरी : बाळ खडपकर

 

आपल्या माणसाबद्दलचं प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान किती असतो, याचं जिवंत चित्र सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पाहायला मिळालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्याशा नेतर्डे गावातून उभं राहिलेलं नेतृत्व जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झालं… आणि संपूर्ण गावाचं मन आनंदाने भरून आलं. आपल्या गावच एक लेकरू जिल्हा परिषदेचं अध्यक्ष होत! अशा नेतृत्वाच्या सत्कारासाठी नेता डे गावातील शालेय मुलांसह ग्रामस्थ नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षक दाखल झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांची आदर युक्त भेट घेत शुभेच्छा दिल्या!

हा केवळ सत्कार नव्हता… तर गावाने आपल्या लेकराला दिलेला प्रेमाचा, विश्वासाचा आणि अभिमानाचा एक भावनिक मुजरा होता. नेतर्डेच्या या क्षणाने पुन्हा एकदा सिद्ध केलं—गाव लहान असलं तरी स्वप्नं मात्र खूप मोठी असतात!

या आनंदाच्या क्षणात सहभागी होण्यासाठी जि.प. पूर्णप्राथमिक शाळा नेतर्डे नं. १ मधील इयत्ता ३री ते ७वीतील २२ लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह खास उपस्थिती लावली. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद, अभिमान आणि कुतूहल हे शब्दांत मांडणं कठीण होतं. मुख्याध्यापक गणेश घाडी, शिक्षिका सौ. शीतल गवस व श्रीमती दळवी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पालक यांनीही या आनंदात मनापासून सहभाग घेतला.

गावाच्या मातीतील नेतृत्व जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. ग्रामपंचायत सरपंच सौ. सुचिता गवस, उपसरपंच प्रशांत कामत, सदस्य तसेच आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी यांनीही उपस्थित राहून सर्वसामान्यांचा आवाज बनलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष मा. प्रमोदभाई कामत यांचे मनापासून अभिनंदन केले.