कोकणातील जमिनींचे वाद थांबणार कधी?

कोकणात क्राइमरेट महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फारच कमी असतो असे अनेक पोलिस अधिकारी बऱ्याचवेळा सांगत असतात. सिंधुदुर्गात किरकोळ घटना घडतात. हे खर आहे. परंतु सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावात रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षिय महिलेचा खून झाला. कोकणात आजही पूर्वी प्रमाणे आजही सुरू आहेत हेच या घटनेवरून दिसून आले आहे. ओवळीये गावच्या सरस्वती धोंडी सावंत यांच्यावर संशयित बाप-लेकाने कोयत्याने वार केले. त्यात सरस्वती सावंत यांचा मृत्यु झाला आहे. कोकणातील गावो-गावी भाऊबंदकीचे जमिनीचे वाद आज देखिल तसेच आहेत. कोकणातील जमिन वादाच्या हजारो केसेस आजही न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ करत न्याच्या प्रतिक्षेत आहेत. पूर्वी रत्नागिरी हा अखंड एकच जिल्हा असताना आताच्या सिंधुदुर्गातून जमिनवादाच्या केसेस लढवण्यासाठी लोक रत्नागिरीला जायचे. चार-चार दिवस त्यात जायचे. परंतु बांधावरच्या या वादाच्या अनेक केसेस आजही पूर्वी प्रमाणेच सुरू आहेत. एकतर पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीनुसार एखाद्या कुटुंबाची जमिन असेल तर एकेका सातबारावर सर्वांची नावं त्यातूनच अनेकांचे वाद होत रहातात. काही समंजसपणे, तडजोडीने जमिन वाद मिटवले जातात. परंतु अनेकवेळा जमिनीच्या हक्कांवरून केवळ वाद न्यायालयस्तरावर रहात नाही. तर एक-दुसऱ्यावर हल्ले करणे शिवीगाळ करणे, बघून घेण्याच्या धमक्या देणे हे सुरूच रहाते. कुटुंबातील नवीन पिढी समंजसपणा दाखवला तर काही कुटुंबातील वाद हे आपो-आप मिटतात. परंतु ज्यांना सकाळी उठून न्यायालयात जाणे, तारखा पहात रहाणे हे इतके अंगवळणी झालेलं असत. की अशा लोकांना कोणी सामंजस्याचा विचार सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांना पटत नाही. गावात देखिल हे असले जमिनवाद मिटविण्यापेक्षा पेटविणाऱ्यांची संख्या अधिक रहाते. दोन्ही बाजूच्या लोकांना चढवा-चढवी करणारे असतात. विशेषत: एप्रिल-मे महिना, जून-जुलै या शेती हंगामातील दोन महिन्यात भातशेतीच्या हद्दीचे वाद होत असतात. हे वर्षानुवर्षे कोकणातील जमिनवादाचे हे प्रश्न आहेत. फक्त यामध्ये जर दोन्ही बाजूने सामंजस्याने चर्चा करून जमिनवाद सुटू शकतात. परंतु यात एकतर कोणी माघार घ्यायला तयार नसते. दुसरी गोष्ट वडिलोपार्जित असलेली जमिन त्यावर आणखी कोणी हक्क सांगू नये अशी एक मानसिकता असते. त्यातूनच अनेकवेळा हे वाद विकोपाला जातात. काहीवेळा शेजाऱ्याची जमिन आपल्या बाजूलाच असेल तर त्या जमिनीवर आपणाला कब्जा करता आला तर तो करून पहावा असा एक प्रयत्न बऱ्याचवेळा होताना दिसतो. यातूनच ही भांडण वाढत जात असतात. अखंड रत्नागिरी जिल्हा असताना आताच्या सिंधुदुर्गातील एका गावच्या जमिन हद्दीवरील फणसाच्या झाडाचा वाद न्यायालयात पाच-पन्नास वर्षे होता. दोन्ही बाजूकडील कुटुंबिय त्या फणसाच्या झाडावर आपला हक्क सांगायचे अशीच अनेक वर्षे ही केस न्यायालयात सुरू होती. याच दरम्यान एकदा जून महिन्यात पावसाळा सुरू होताना त्या फणसाच्या झाडावर विज कोसळली. ते फणसाचे झाड जळून गेले आणि त्यानंतरच त्या हद्दीवरच्या फणसाच्या झाडाचा वाद थांबला. आपण वाद कशाचे करतोय, भांडण कशासाठी होतायत, माणसांच्या जिवंत असण्यापेक्षा जमिन अधिक महत्वाची होऊ लागली की त्यातून माणूसपण संपून केवळ वादच होतात आणि त्या भांडणात सरस्वती सावंत सारखा कोणाचा तरी बळी जातो. ग्रामीण भागातील जनतेने जमिन जुमल्याचे वाद एका टप्यावर कसे मिटतील हे पहाणे आवश्यक आहे. ओवळीयेच्या घटनेत आजच्या घडीला दोन सावंत कुटुंब खऱ्याअर्थाने उद्धवस्त झाली आहेत. या घटनेत कोणी काय मिळवलं याच्या हिशोबाची मांडणी जेव्हा मनात मांडली जाईल तेव्हा शेवटी अरे चूकलच अस जरूर वाटेल पण तोपर्यंत वेळ तर निघून गेलेला आहेच. शेवटी पोलिस तपास, न्यायालय योग्य न्याय करेलच.