कोंडयेतील काजू चोरी प्रकरण उघडकीस; तीन आरोपी गजाआड, टेम्पोसह मुद्देमाल जप्त

 

कणकवली : कोंडये गावातील वरचीवाडी येथे घडलेल्या सुमारे दोन टन काजू बियांच्या चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वेगाने छडा लावत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सुमारे तीन लाख वीस हजार रुपयांच्या काजू बियांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

या प्रकरणी दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर व विलास विठ्ठल तेंडुलकर यांची सुमारे सात एकर क्षेत्रातील काजू बागायत आहे. या बागेत सुमारे एक हजार काजूची झाडे असून शेतमांगरामध्ये काजू बियांचा साठा ठेवण्यात आला होता. २२ मार्च रोजी दिवसभर काजू बिया गोळा करून सायंकाळी शेतमांगराला कुलूप लावून ते घरी परतले होते. मात्र २३ मार्च रोजी सकाळी शेतमांगर उघडताना दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. आत पाहणी केली असता सुमारे दोन टन काजू बियांचा साठा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

 

याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना कातकरी समाजातील काही तरुणांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले.

 

त्याअनुषंगाने पोलिसांनी पप्या सुनील पवार (वय २६, गणपती साना, कणकवली), संदीप सुरेश पवार (वय २२, पाईप वडाचा पाट), बंटी स्वप्नील पवार (वय २२, गणपती साना, कणकवली) यांना अटक केली. तसेच काजू बियांची वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या टेम्पोचा मालक अनंत मधुकर परब (पोईप) यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी काजू वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो जप्त केला आहे. आरोपींनी किरण पोळी परिसरात काजू बियांची विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर, ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी आदींच्या पथकाचा सहभाग होता.