रत्नागिरी ः प्रतिनिधी
आंब्याच्या झाडाखाली पतेरा पेटवल्याच्या रागातून एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण्ा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सोमवार 30 मार्च रोजी सायंकाळी 5.15 वा.सुमारास चिंचखरी मधलीवाडी येथे घडली आहे.
आत्माराम बाळाराम बोरकर (77,रा.मधलीवाडी,चिंचखरी,रत्नागिरी) आणि संतोष बाबुराव सुर्वे (63,रा.मधलीवाडी,चिंचखरी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.याबाबत संतोष सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी ते आपल्या जागेतील आंब्याच्या झाडांवर माकडे आलेली आहेत का,ते पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित आत्माराम बोरकर हा आंब्याच्या झाडाखाली पालापाचोळा एकत्र न करता झाडाखालीच आग लावलेली होती. याबाबत संतोष सुर्वे यांनी त्याला विचारणा केल्यावर त्याने शिवीगाळ व दमदाटी करत झाडाखाली पातेरा पेटवून तयार झालेले आंबे होरपळून नुकसान केले.
आत्माराम बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी 4.30 वा.सुमारास ते आपल्या घरासमोरील व परिसरातील आजुबाजुच्या झाडांचा पडलेला पतेरा गोळा करुन जाळत होते. त्यावेळी संतोष सुर्वे त्याठिकाणी आला आणि त्याने पूर्वीच्या जमिन जागेच्या वादातून मनात राग धरुन हातातील कोयती उलटी मानेवर व डाव्या मांडीवर मारुन तसेच डाव्या हाताच्या ओटावर कोयतीची धार लागून दुखापत केली.












