दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली ते मंडणगड मार्गावर मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने डंपरमध्ये विद्युत प्रवाह उतरला आणि त्यातून बसलेल्या तीव्र धक्क्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान दापोली-मंडणगड मार्गावरील मा. भवानी मार्बल दुकानासमोर ही दुर्घटना घडली. डंपर चालक अशफाक हुसेन आराई (वय सुमारे ६० वर्षे) हे आपल्या डंपरमधून मातीची वाहतूक करत होते. माती खाली करत असताना डंपरचा मागील भाग वर उचलला गेला आणि त्याचा स्पर्श थेट वीज वाहिनीशी झाला. या घटनेनंतर काही क्षणातच डंपरमध्ये जोरदार विद्युत प्रवाह पसरला.
या अचानक झालेल्या विद्युत प्रवाहामुळे चालक अशफाक हुसेन यांना तीव्र विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
मृत अशफाक हुसेन आरार्इ हे मूळचे ताडील गावचे असून सध्या दापोलीतील खोंडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.












