कृषी महोत्सवातून उमलली प्रगतीची नवी पहाट: तंत्रज्ञान, सन्मान आणि समृद्धीचा त्रिवेणी संगम 

▪️कट्टा येथील कृषी महोत्सवातून मिळाला प्रगतीचा नवा मंत्र.

▪️मार्च महिन्यातील धावपळीत कृषी विभागाचे ‘यादगार’ व्यवस्थापन.

▪️कृषी विभागाच्या विविध योजना आणि अवजारांच्या दालनाला शेतकऱ्यांची पसंती.            

मसुरे | झुंजार पेडणेकर 

मालवण तालुक्यातील कट्टा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांचे वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत ‘कृषी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते.

बदलत्या हवामानाच्या काळात शेतीपुढील आव्हाने पेलण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित ‘कृषी महोत्सव’ अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला. हा महोत्सव केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे आणि ज्ञानाचे ‘हक्काचे व्यासपीठ’ ठरला आहे. शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरण्याची नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.

ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण-

महोत्सवाचे सर्वात मोठे यश म्हणजे शेतकऱ्यांना मिळालेला संवादाचा प्लॅटफॉर्म. विविध स्टॉल वर शेतकरी एकत्र येत मालाची माहिती घेत होते. प्रगतशील शेतकऱ्यांचे नंबर लिहून घेताना दिसत होते.

* प्रक्रिया उद्योग: कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे ब्रँडिंग कसे करावे, याचे तंत्र शेतकऱ्यांनी जाणून घेतले. यामुळे भविष्यात शेतकरी केवळ उत्पादक न राहता ‘उद्योजक’ बनण्याच्या दिशेने पाऊल टाकणार आहेत.

* विषमुक्त शेती आणि आरोग्याचा जागर-

वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावत आहे. या पार्श्वभूमीवर महोत्सवात ‘विषमुक्त शेती व सकस आहार’ यावर विशेष माहिती देण्यात आली . नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीतून दर्जेदार उत्पादन घेऊन लोकांच्या आरोग्याचे रक्षण कसे करता येईल, याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामुळे ग्राहकांनाही शुद्ध शेतमाल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हवामान बदल आणि परिणाम याबाबत डॉ उमराज मठार यांनी माहिती दिली.

▪️महिला सक्षमीकरण आणि बचतगटांचे योगदान-

ग्रामीण अर्थव्यवस्थेत बचतगटांचे महत्त्व आणि त्यांच्या माध्यमातून उत्पादित मालाला बाजारपेठ कशी मिळवावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

 

* सन्मान आणि आत्मविश्वास-

मान्यवरांच्या हस्ते झालेला आदर्श शेतकरी सत्कार सोहळा हा महोत्सवाचा भावनिक क्षण ठरला. कष्टाचे चीज झाल्याची भावना सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावर होती. यामुळे उपस्थित तरुण शेतकऱ्यांमध्ये शेती करण्याची जिद्द आणि उत्साह वाढण्यास मोठी मदत झाली.

*राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान-

या प्रदर्शनामध्ये पौष्टिक तृणधान्य म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी यांसारख्या धान्यांची मांडणी करण्यात आली होती. तसेच अनोखी अशी रांगोळी घालण्यात आली, जेणेकरून याचे महत्त्व व ओळख सर्वसामान्य जनता व अन्न पिकवणाऱ्या बळीराजाला व्हावी. कारण ज्वारी, बाजरी, नाचणी सोडली तर काही तृणधान्ये लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

▪️ वैविध्यपूर्ण शेती पिकांची मांडणी

प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण तयारी केलेला शेतमाल, फळे, भाजी हे महोत्सवाचे आकर्षण होते. उद्देश असा होता की, शेतकऱ्याने विकसित केलेली एखादी पिकाची जात, वैशिष्ट्यपूर्ण फळे, लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती, औषधी गुणधर्मांच्या जाती यांना पुन्हा एकदा प्रकाशात आणणे व त्यांना व्यासपीठ देणे.या कृषी प्रदर्शनात हेच पाहायला मिळाले, जसे की लाल केळी,लाल शेवग्याच्या शेंगा, किलोचा नारळ, १५ किलोचा गावरान भोपळा,एका कंदापासून झालेला १३ किलोचा हळदीचा कंद,औषधी गुणधर्माचा तांदूळ (लाल, काळी, सफेद हळद), सफेद, पौष्टिक बटाटा,स्थानिक नारळ, सुपारीचे वाण, मधुमेही रुग्णांना दिलासा देणारा ‘रक्तसाळ’ भात (ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा वाढते), पॅरालिसिसवर आराम देणारा ‘करहानी’ भातअसे बऱ्याच वैविध्यपूर्ण शेती पिकांची मांडणी व शेतकऱ्याचे नाव व संपर्क क्रमांकासहित उपलब्ध असल्याने कित्येक शेतकऱ्यांचे फोन संबंधित उत्पादकाला गेले. हे आवर्जून ५ किलोचा नारळ घेऊन आलेल्या वेंगुर्ला, होडावडा येथील श्री. मंगेश माणगावकर या शेती उत्पादकाने सांगितले.

▪️शेती औजारांचे दालन:

कृषी महोत्सवास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना कोणकोणती औजारे ही कृषी विभागाकडून मिळतात, याची मांडणी ही शेती औजारांच्या दालनात करण्यात आलेली होती. तालुका स्तरीय हा कृषी महोत्सव असला तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील औजारे विक्रेत्यांनी येथे हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या भेटीमुळे समाधान व्यक्त केले.

कृषी विभागाच्या योजनांचे दालन:

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत, याची माहिती बॅनर, पत्रके तसेच प्रत्यक्ष देण्यात येत होती. ‘महावितरण AI ॲप’, ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’, ‘मागेल त्याला काजू’, ‘पाणी फाऊंडेशन – फार्मर कप’, ‘महाडीबीटी यांत्रिकीकरण योजना’, ‘संपूर्ण महाराष्ट्र राज्य फलोत्पादन योजना’ याविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळाली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यावर या महोत्सवाच्या माध्यमातून भर देण्यात आला. तसेच भाताची ‘श्री’ पद्धत, गांडूळ खत, शेततळे, अरुंद वरंबा पद्धत यांचे मॉडेल याद्वारे ही माहिती देण्यात येत होती.

▪️पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा:

सर्वांना घरामध्ये सकस जेवण देणारी अन्नपूर्णा म्हणजे घरातील महिला. आजच्या ‘इन्स्टंट फूड’च्या जमान्यात आपण नेमके काय खातो हे कुणाच्याच ध्यानीमनी नाही. सर्वांना इतके माहित आहे की आपण चुकीचे खातो आणि त्यामुळे घराघरात आज आजार वाढलेत. यासाठी विषमुक्त व सकस, पौष्टिक आहाराचे महत्त्व सर्वांना कळावे या उद्देशाने पौष्टिक तृणधान्याच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. अशाच कार्यक्रमाची महिलांनी पुन्हा मागणीही केली.

▪️प्रक्रिया केलेल्या मालाला विक्रीचे दालन उपलब्ध- या महोत्सवाचा एक भाग म्हणजे शेतकऱ्यांनी प्रक्रिया केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपला उद्योग सुरू केला आहे. त्यांना विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. शिवाय सेंद्रिय शेती अभियान मधील शेतकऱ्यांनी देखील यात विक्रीचा स्टॉल लावलेला. त्यांचे सेंद्रिय शेतमाल विक्री झाले व आणखी माल मिळावा यासाठी त्यांना संपर्क झाला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.

विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या या धावपळीत कमी वेळात आयोजित केलेले व उत्कृष्ट नियोजन असलेले हे कृषी प्रदर्शन होते. मार्चमध्ये नियोजन करण्याचा उद्देश म्हणजे या महिन्यात मोठ्या प्रमाणात फळफळावळ उपलब्ध होतात व तेच आकर्षण हे येणाऱ्या प्रत्येकाचे असते.

 

कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांमध्ये संवाद व्हावा यासाठी दुपारच्या सत्रात ‘शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. हवामान शास्त्रज्ञ डॉ. उमराज मठार यांच्या मार्गदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. एरवी बऱ्याच वेळा दुपारच्या जेवणानंतर उन्हामुळे प्रदर्शनात येणाऱ्यांचा ओघ किंवा प्रतिसाद अल्प असतो, परंतु हे प्रदर्शन वा महोत्सव संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता आणि हेच या कृषी महोत्सवाचे यश होते असे म्हणता येईल. जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे आणि मालवण तालुका कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून हा कृषी महोत्सव यादगार ठरला.

या महोत्सवामुळे शेतकऱ्यांमध्ये एकीची भावना निर्माण झाली. मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकत्र आल्याने एक मजबूत नेटवर्क तयार झाले . माहिती, तंत्रज्ञान आणि सन्मान या तीन सूत्रांमुळे शेती आता अधिक फायदेशीर आणि आनंददायी होईल असा ठाम विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सन्मानित शेतकरी प्रतिक्रिया

* धोंडी अनंत नाईक (मिरी बांबू सुपारी उत्पादक शेतकरी -आंबेरी) माझ्यासारख्या वयाने जेष्ठ पण उत्साहाने तरुण असलेल्या शेतकऱ्याचा सन्मान या कृषी महोत्सवात करण्यात आला. शेतकऱ्याला यापेक्षा आणखी काय पाहिजे. कृषी विभाग सर्वांसाठीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

 

*साईराज पावसकर (युवा शेतकरी गोळवण) मी नोकरीकडे न जाता शेतीमध्येच करिअर करायचे ठरवले. त्यासाठी मला मालवण कृषी विभागाने मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले. एक युवा शेतकरी म्हणून घडण्यास मला हा माझा झालेला सन्मान सोहळा आयुष्यातील सुवर्णक्षण राहणार आहे असे साईराज म्हणाले.