जुवाठी शिर्केवाडीत विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान; वन विभागाची ४ मिनिटांत थरारक बचाव मोहीम

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या अंदाजे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन विभागाने अत्यंत कौशल्याने सुखरूप बाहेर काढले. केवळ ४ मिनिटांत पिंजऱ्यात जेरबंद करून या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजे जुवाठी शिर्केवाडी येथील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत एक वन्यप्राणी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहीर सुमारे ३५ ते ४० फूट खोल असून, बिबट्या विहिरीतील एका दगडावर जीव वाचवण्यासाठी बसला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील यांनी तात्काळ परिमंडळ वन अधिकारी, राजापूर यांना दूरध्वनीवरून याची कल्पना दिली.
माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सकाळी ११:०५ वाजता विहिरीत दोरीच्या साहाय्याने पिंजरा सोडण्यात आला. बिबट्या अत्यंत सावध होता, मात्र वन विभागाच्या चपळाईमुळे अवघ्या ४ मिनिटांत, म्हणजेच ११:०९ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.
जेरबंद केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. श्री. वेर्लेकर यांनी बिबट्याची सखोल तपासणी केली. सदर बिबट्या मादी जातीचा असून ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री त्यांनी केली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीम. गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड आणि वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या मादी बिबट्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
या यशस्वी मोहिमेत वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार यांच्यासह रेस्क्यू टीममधील दीपक चव्हाण, निलेश म्हादये, नितेश गुरव, संदीप जाधव, साहील जांगळी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
“वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास किंवा लोकवस्तीत आल्यास घाबरून न जाता किंवा त्यांना इजा न पोहचवता तात्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ यावर संपर्क साधावा,” असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीम. गिरिजा देसाई यांनी केले आहे.