घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘शोध २०२६’ तांत्रिक महोत्सव उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील लवेल येथील नामांकित Gharada Institute of Technology मध्ये १३ व १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव ‘शोध २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांसह डिप्लोमा आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संगणक अभियांत्रिकी (एआयएमएल) विभागप्रमुख प्रा. एस. डी. लाटकर यांनी प्रास्ताविक करत उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून घरडा फाउंडेशनचे हेड ऑफ ऑपरेशन्स अँड सोशल इनिशिएटिव्ह्ज श्री. गोपाल थम्पी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. घरडा यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे स्वप्न आणि त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील होते. त्यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांची माहिती दिली. महोत्सवाचे समन्वयक डॉ. अरुण ढंग यांनी आभार प्रदर्शन केले.
या दोन दिवसीय महोत्सवात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ग्रीन एनर्जी, इंडस्ट्रियल सेफ्टी, थ्री-डी प्रिंटिंग आणि टाऊन प्लॅनिंग यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर आधारित विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख होण्याबरोबरच संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली.
महोत्सवांतर्गत पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्निकल क्विझ, बिझनेस प्लॅन, इंडस्ट्रियल सेफ्टी चॅलेंज, कॅड मॉडेलिंग आणि सर्किट डिझाईनिंग अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्ष प्रोटोटाइप स्वरूपात सादर केल्या. तसेच डिप्लोमा तसेच अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी लॅन गेमिंग आणि बॉक्स क्रिकेटसारख्या विशेष स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला भव्य ऑटो एक्स्पो होय. या ऑटो एक्स्पोमध्ये Tata Motors, Hyundai Motor Company, Maruti Suzuki, Honda आणि Suzuki यांसारख्या नामांकित कंपन्यांनी आपल्या विविध कार आणि दुचाकी मॉडेल्सचे प्रदर्शन सादर केले होते. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन वाहनांची माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच स्पोर्ट्स बाइक्स आणि आकर्षक पद्धतीने मॉडिफाइड केलेल्या कार्सचे प्रदर्शनही उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.
या महोत्सवात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षकांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘शोध २०२६’ हा तांत्रिक महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.