कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमाला गती; मुरडे येथे संगणक संचांचे लोकार्पण उत्साहात

खेड (प्रतिनिधी) : कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमांतर्गत कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुरडे (ता. खेड) येथील कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था खेड (मुंबई) संचलित भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमावेळी भाजपा विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी वहिनी वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शाळेला संगणक संचांचे वितरण करण्यात आले. यामध्ये संगणक (CPU), मॉनिटर, प्रिंटर तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक इतर साधनसामग्रीचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाला शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अजय तोडकरी, शशांक सिनकर, प्राचार्य संभाजी देवकते, निलेश उर्फ बंधू ओतारी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह शिक्षकवृंद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची जोड देत त्यांना स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम भविष्यात सक्षम व तंत्रज्ञानसज्ज पिढी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.