सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने प्राथमिक सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील २२७ पैकी २१४ संस्थांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून सर्व संस्था ERP प्रणालीवर कार्यरत झाल्या आहेत. तसेच Hand Over Certificate (HOC) प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली असून २१३ संस्थांमध्ये डायनामिक डे-एंड यशस्वीपणे सुरू आहे.
महाराष्ट्रातील ३३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक डायनामिक डे-एंड असणारी बँक म्हणून ९.९९ गुणांसह सिंधुदुर्ग बँकेने अव्वल स्थान मिळवले आहे. सहकार विभाग आणि नाबार्डकडून या सर्व संस्थांना E-PACS म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि विश्वासार्ह झाला असून कर्जवाटप, वसुली, ठेवी व लेखा व्यवस्थापन अधिक जलद आणि अचूक झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांना याचा थेट लाभ होत असून खात्याची माहिती तत्काळ उपलब्ध होत आहे.
या यशामागे नोडल अधिकारी वसंत हडकर, SI टीम प्रमुख महेश पारधी, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक बाळ परब, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक दीपाली माळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि सर्व संबंधितांच्या समन्वयित प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील ही डिजिटल वाटचाल आगामी काळात अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.











