सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :
खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी होत असलेल्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवस या जिल्ह्यात उत्सव म्हणून साजरा करण्याचे व त्या निमित्ताने जिल्हाभर विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ उत्साहात साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाच्या , खेळाडूंना आकर्षक रोख बक्षिसे आणि ट्रॉफींची खैरात केली जाणार आहे, या वाढदिवसाचा उत्सव एक यादगार होईल अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावंत यांनी सांगितले की, खासदार राणे हे सिंधुदुर्गचे सुपुत्र असल्याने त्यांचा वाढदिवस संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘क्रीडा महोत्सवा’ला विशेष महत्त्व देण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.
तालुका निहाय स्पर्धांचे वेळापत्रक असे :
कणकवली तालुक्यात ५ एप्रिल रोजी बॅडमिंटन स्पर्धा होणार असून १५ वर्षांखालील एकेरी, महिला खुला एकेरी, ४० वर्षांवरील दुहेरी तसेच पुरुष एकेरी व दुहेरी गटांचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यात १० एप्रिलला कुस्ती स्पर्धा, देवगडमध्ये ५ एप्रिलला सायक्लोथॉन, कुडाळमध्ये १० एप्रिलला आंतरराज्यीय बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
मालवण तालुक्यात १० व ११ एप्रिल रोजी बास्केटबॉल डे-नाईट स्पर्धा रंगणार आहेत, तर सावंतवाडीमध्ये १० एप्रिलला टेबल टेनिस स्पर्धांमध्ये १९ वर्षांखालील तसेच खुल्या गटातील सामने होणार आहेत. वेगुर्ला तालुक्यात ११ व १२ एप्रिल रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा, तर दोडामार्ग तालुक्यात ८ एप्रिलला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धा पूर्णपणे खुल्या आणि विनाशुल्क असणार असून प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या क्रीडा महोत्सवाला यशस्वी करावे, असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
या संपूर्ण क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली असून, अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संयोजकांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘संसद कोकण समृद्धी महोत्सवा’अंतर्गत जिल्हास्तरीय प्रमुख कार्यक्रमाचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, त्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.












