करूळ घाटात भीषण अपघात : विजापूर येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू

सिमेंटचा ट्रक खोल दरीत कोसळला

वैभववाडी प्रतिनिधी :
सिमेंटने भरलेला ट्रक करूळ घाटात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर (कर्नाटक) येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजू प्रेमसिंग राजपूत (वय ५९) आणि राहुल राजू राजपूत (वय २०, रा. विजापूर, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथून सिमेंट घेऊन ट्रक (क्र. KA 28 AA 5545) वैभववाडीकडे येत होता. चालक राजू राजपूत याच्यासोबत त्याचा मुलगा राहुल राजपूतही ट्रकमध्ये होता. त्यांच्या मागोमाग गोपाळ महादेव राठोड यांचा ट्रक येत होता. पहाटे ४ वाजता गगनबावडा येथे सर्वांनी थांबून चहा घेतल्यानंतर प्रवास पुन्हा सुरू केला.
करूळ घाटात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ट्रक आला असता चालकाचा ताबा सुटून ट्रक घाटरस्त्यावरील क्रॅश बॅरिअर तोडत सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमधील सिमेंटच्या बॅगा दरीत विखुरल्या होत्या. हा ट्रक करूळ दिंडवणेवाडी परिसरातील घनदाट जंगलात अडकला होता.

या अपघाताची माहिती पाठोपाठ येणारे चालक गोपाळ राठोड यांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर दिली. त्यानंतर काही मिनिटांत वैभववाडी पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपनिरीक्षक उल्हास जाधव, एएसआय फकरुद्दीन आगा, हवालदार संदीप कांबळे, पोलीस नाईक उद्धव साबळे, सुरज पाटील, अजय बिल्पे, किरण मेथे, मोहन राणे, हरेश जायभाय, रणजीत दबडे, किरण कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री जीव रक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग, रविंद्र सावंत, विजय सावंत, विजय पवार, रत्नकांत राशिवटे, रविंद्र चव्हाण, आनंद शिंदे, अमर शिंदे, रघुनाथ चव्हाण, गौरव मोरे, सागर पडवळ, सत्यविजय मोरे, वसंत पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले.
तसेच भैरीभवानीचे मालक गिरीधर रावराणे व करुळ ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ३०० फूट खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी टीमला मोठी कसरत करावी लागली. राहुल राजपूत याचा मृतदेह ट्रकबाहेर फेकला गेला होता, तर राजू राजपूत यांचा मृतदेह केबिनमध्ये अडकलेला होता. जीवरक्षकांनी केबिन फोडून मृतदेह बाहेर काढला.
दोन्ही मृतदेह दिंडवणेवाडी मार्गे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच राजपूत कुटुंबीय मोठ्या संख्येने वैभववाडीत दाखल झाले. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत राजू राजपूत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.
दरम्यान, अपघातस्थळी मदत करणाऱ्या सह्याद्री जीव रक्षक टीम आणि स्थानिक ग्रामस्थांचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी आभार मानले. उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करत आहेत.