पटसंख्या निकषाबाबत आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार” – मिलिंद नाईक

आवळेगाव हायस्कूलमध्ये १०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

स्वप्निल कदम :कुडाळ-
शैक्षणिक संस्था चालवणे हे आजच्या काळात अत्यंत कठीण कार्य बनले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या संस्थांनी मोठा आधार दिला आहे. आवळेगाव येथील शिक्षण संस्थेने केलेले कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे. मात्र पटसंख्या अभावी शिक्षकांच्या संख्येमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पटसंख्या निकषाबाबत संस्थांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी केले.

तालुक्यातील आवळेगाव हायस्कूल येथे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या वतीने १०० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य नागेश अहिर, पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत, श्रावणी तेरसे, आवळेगाव सरपंच पूर्वा सावंत, संस्थाध्यक्ष मानसी सावंत, कसाल सरपंच राजन परब, उदय सावंत, तुळसुली सरपंच नूतन आईर, नरेश परब, भिकाजी तळेकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, मुख्याध्यापक दशरथ काळे, संस्था पदाधिकारी राजेंद्र सावंत, प्रशांत सावंत, डॉ. सावंत यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर यांनी सायकल वाटप उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, “किशोर पाटकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.”

कार्यक्रमादरम्यान सरपंच राजन परब तसेच मुख्याध्यापक दशरथ काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आनंद आणि समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र सावंत यांनी केले. त्यांनी आवळेगाव शिक्षण संस्थेच्या उभारणीत सुरुवातीपासून योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच खासदार नारायण राणे यांनी संस्थेच्या इमारतीसाठी दिलेल्या आर्थिक सहाय्याचा उल्लेख करून समाधान व्यक्त केले.

एकूणच, या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होणार असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.